‘डार्कवेब’ ड्रग्स रॅकेट गोव्यापर्यंत; एनसीबीचे देशभर छापे
Drugs Case: देशात विविध प्रकारच्या ड्रग्स तस्करीचे जाळे दिवसेंदिवस वाढतच आहे. तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट डार्क वेबद्वारे चालविले जात आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) डार्क वेबद्वारे देशभर ड्रग्सचे रॅकेट चालविणाऱ्या टोळीतील देशभरातून गोव्यातील तरुणासह ६ जणांना अटक केली.
संशयितांकडून सुमारे १५ हजार एलएसडी ब्लॉट्स व २.५ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दिल्लीतील एका महिलेसह गोवा, केरळ, नोयडा, उत्तर प्रदेश या राज्यातील संशयिताचा समावेश आहे.
नोयडा येथे खासगी विद्यापीठात शिकणाऱ्या गोव्यातील तरुणाला अटक झाल्यानंतर या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. त्यामुळे हे डार्कनेट ड्रग्स तस्करीचे आंतरराष्ट्रीय जाळे गोव्यापर्यंतही पोहचल्याने पोलिस यंत्रणेसमोर आव्हान उभे राहिले आहे.
देशातील विविध भागातून एलएसडीची तस्करी कुरियर व टपाल सेवेतून होत असल्याची माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला मिळाली होती. त्यामुळे या तस्करीचा पर्दाफाश करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून ही यंत्रणा काम करत होती.
सोशल मीडियाचा वापर करून ही तस्करी कशाप्रकारे डार्क वेबद्वारे होत होती, याची परिपूर्ण माहिती स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकाने मिळवली. त्यातून नोयडा येथे एका खासगी विद्यापीठात शिकत असलेल्या गोव्यातील तरुणाच्या कारवायांवर नजर ठेवण्यात आली.
त्याला ताब्यात घेतल्यावर एलएसडी ड्रग्सचा साठा ‘विक्र’ या नावाने मेसेज करून मागविला होता. काश्मीर येथील एका ग्राहकाला तो पाठवणार होता. त्याच्या माहितीच्या आधारे दिल्लीतील एका तरुणाला अटक करून त्याच्याकडूनसुमारे 650 एलएसडी ब्लॉट्स जप्त केले होते.
…