गोवासिनेनामा 

‘गोमंतकीय चित्रपट व चित्रपट कलाकारांचा मान राखावा’

राज्यातील नामवंत सिनेकर्मींचे राज्य सरकारला आवाहन

पणजी :
आज पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक लक्ष्मीकांत शेटगावकर यांनी गोवा सरकार व गोवा मनोरंजन संस्था (ईएसजी) यांच्यावर ‘गोवा फिल्म फायनान्स स्कीम’अंतर्गत निधीचे वितरण न केल्याबद्दल तीव्र टीका केली. “प्रत्येक इफ्फीपूर्वी सरकार मोठमोठी आश्वासने देते, परंतु प्रत्यक्षात निधी वितरणात विलंब होतो, ज्यामुळे अनेक गोमंतकीय चित्रपट अर्धवट अवस्थेत थांबतात,” असे ते म्हणाले.

शेटगावकर म्हणाले की, स्थानिक चित्रपट निर्मितीला चालना देण्यासाठी सुरू केलेली ही योजना आता नोकरशाहीची अकार्यक्षमता आणि राजकीय दुर्लक्ष यांची बळी ठरत आहे. “सरकारने आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवापूर्वीच मंजूर केलेला निधी वितरीत केला पाहिजे, अन्यथा हा विलंब गोव्याच्या सर्जनशील क्षेत्राला कायमचे नुकसान करेल,” असे त्यांनी शेटगांवकर यांनी स्पष्ट केले.

चित्रपट कलाकार साईश पै पाणंदीकर यांनी एनएफडीसीच्या निवडप्रक्रियेवर अन्यायकारक धोरणाचा आरोप केला. त्यांनी  नमूद केले कि, “क्लावडिया”सारखा चित्रपट जो कुठेही प्रदर्शित झालेला नाही आणि भारतीय पॅनोरामा विभागात निवडला गेला नाही, तो ‘स्पेशल प्रेझेंटेशन’ म्हणून दाखवला जाणार आहे; तर आंतरराष्ट्रीय पातळीवर दोन पुरस्कारप्राप्त कोंकणी चित्रपट ‘आसेंसांव’ का दुर्लक्षित राहावा? त्यांनी मागणी केली की, आसेंसांव चित्रपटाचा समावेश इफ्फी-२०२५ मध्ये करावा.

गोवा मनोरंजन संस्थेचे माजी सदस्य विशाल पै काकोडे यांनी सरकारवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत, “इफ्फीचा ब्रॅण्ड व्हॅल्यू आता कमी झाला आहे. आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींची उपस्थिती आणि प्रायोजकांची संख्या घटत आहे, ही चिंतेची बाब आहे. आपलेच गोमंतकीय चित्रपट व चित्रपट कलाकार यांचा सन्मान न करणारे राज्य जगाला काय दाखवणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

यासोबतच भारतीय चित्रपटसृष्टीतील अग्रगण्य गोमंतकीय सिनेमाटोग्राफर के. वैकुंठ यांच्या शताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करावा आणि त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, अशी मागणी फिल्म फ्रॅटर्निटी ऑफ गोवाने केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!