प्रसिद्ध चित्रपट समीक्षक, अभ्यासक सुधीर नांदगावकर यांचे निधन
ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक, समीक्षक आणि प्रभात चित्रपट मंडळाचे संस्थापक सुधीर नांदगावकर यांचं वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. ५० हून अधिक वर्ष ते प्रभात चित्रपट मंडळाचे काम पहात होते. गेले काही दिवस ते आजारी होते आज अखेर संध्याकाळी ५ वाजता त्यांनी माजीवाडा येथे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर उद्या सकाळी ठाण्यात (Thane) अंत्यसंस्कार होणार आहेत. नुकताच त्यांना एशियन फिल्म फाउंडेशन तर्फे २०२२ चा ‘सत्यजित राय पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता.
चित्रपट सर्वसामान्य माणसांमध्ये रुजवण्यात सुधीर नांदगावकर यांचं फार योगदान आहे. त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य मराठी रसिकांना चित्रपटाशी जोडण्यात घालवलं. दर्जेदार आणि परखड लिखाण आणि चित्रपटक्षेत्रातील दांडगा अभ्यास यामुळे त्यांच्या नावाला मनोरंजनसृष्टीत एक वजन होतं. त्यांच्या निधनामुळे चित्रपटांचा एक सच्चा अभ्यासक आणि चाहता हरपला अशी भावना सगळे व्यक्त करत आहेत.
‘प्रभात’चे काम, फिल्म सोसायटींच्या राष्ट्रीय स्तरावरील फेडरेशमधील राजकारण, फ्रिप्रेस्की ही चित्रपट समीक्षकांची आंतरराष्ट्रीय संघटना आणि स्वतःचा व्यवसाय अशा सर्व बाजू एकाच वेळी सारख्याच कौशल्याने चालविण्याची हातोटी त्यांना साधलेली होती. रात्रंदिवस झटणारा कार्यकर्ता आणि उत्तम संघटक अशी दोन्ही व्यक्तिमत्वे त्यांच्या ठायी एकवटलेली होती.
लोकांची चित्रपटातील अभिरुची वाढावी, तसेच प्रेक्षकांनी उत्तमोत्तम चित्रपटांचा आस्वाद कसा घ्यायचा यासाठी नांदगावकर कायम झटत राहिले. प्रभात चित्रपट मंडळाच्या वेगवेगळ्या चळवळीतून तसेच उपक्रमातून नांदगावकर यांनी चित्रपट माध्यमाचा भरपूर प्रचार केला. बऱ्याच चित्रपट महोत्सवात त्यांनी परीक्षक म्हणून काम केलं आहे. मामी फेस्टिव्हल हा नांदगावकर यांच्याच संकल्पनेतून उभा राहिला.
जी गोष्ट सध्या मोठमोठ्या इंस्टीट्यूटमध्ये ‘Film Appreciation’ या नावाखाली शिकवली जाते, या गोष्टीचा पाया नांदगावकरांनी कित्येक वर्षांपूर्वी रचून ठेवलेला आहे. चित्रपट या माध्यमावर नितांत प्रेम करणाऱ्या आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत प्रचार करणाऱ्या या निस्सीम चाहत्याचा निधनाने प्रभात चित्र मंडळ, इतर काही संस्था आणि समस्त चित्रपटप्रेमी लोक पोरके झाले.