‘भाजपाकडून आम्हाला सापत्न वागणूक देण्यात येत आहे’
मुंबई:
गेल्यावर्षी एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १३ खासदारांनी शिवसेनेत बंडखोरी केली. त्यानंतर भाजपाबरोबर जात एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन केलं. पण, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचं दिसत आहे. अशातच खासदार गजानन कीर्तिकर यांनी केलेल्या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. भाजपाकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा दावा कीर्तिकरांनी केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
गजानन कीर्तिकर म्हणाले, “आम्ही १३ खासदार एकनाथ शिंदेंबरोबर आलो असून, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा ( एनडीए ) घटक पक्ष आहोत. यापूर्वी आम्ही एनडीएचा घटकपक्ष नव्हतो. त्यामुळे एनडीएचा भाग असल्याने आमची काम झाली पाहिजेत. घटकपक्षाला दर्जा दिला पाहिजे, ही आमची मागणी आहे. भाजपाकडून आम्हाला सापत्न वागणूक देण्यात येत आहे.”
लोकसभेला २२ जागांवर दावा करणार का? असा प्रश्न विचारल्यावर कीर्तिकरांनी म्हटलं की, “दावा करण्याची गरज नाही. २२ जागा शिवसेनेच्या आहेतच. २०१९ साली भाजपा आणि शिवसेना एकत्र लढली होती. तेव्हा भाजपाला २६ आणि शिवसेनेला २२ जागा देण्यात आल्या. २६ पैकी भाजपाचे २३ खासदार, तर शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले होते.”