पंतप्रधान मोदींवरील ‘बीबीसी’चा माहितीपट Youtube आणि ट्विटरवर ब्लॉक
आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी ‘बीबीसी’ने अलीकडेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरात दंगलीबाबत एक माहितीपट प्रदर्शित केला आहे. बीबीसीने ‘इंडिया: द मोदी क्वेशन’ नावाच्या माहितीपटातून गुजरात दंगलींमध्ये तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. यामध्ये गोधरा हत्याकांड आणि त्यानंतर उसळलेल्या दंगली या घटनांशी संबंधित राजकीय नेते, पत्रकार आणि पीडित लोकांच्या प्रतिक्रिया दाखवल्या आहेत. नरेंद्र मोदी यांच्यामुळेच गुजरात दंगलीमध्ये अनेक निष्पाप लोकांचे प्राण गेले, अशाप्रकारचं चित्रण या माहितीपटातून करण्यात आलं आहे.
‘बीबीसी’ने हा माहितीपट प्रदर्शित करताच याचे भारतात पडसाद उमटले आहेत. केंद्र सरकार आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी यावर आक्षेप घेतला. यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या आदेशानुसार, बीबीसीचा संबंधित माहितीपट यूट्यूब आणि ट्विटरवर ब्लॉक करण्यात आला आहे. ‘एएनआय’ने सूत्रांच्या हवाल्याने याबाबतचं वृत्त दिलं आहे.