‘सरकारने ‘भांगरभूंय गोवा’चा ‘भंगार अड्डा’ केला’
मडगाव :
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील अत्यंत बेजबाबदार आणि भ्रष्ट भाजप सरकारने आमच्या “भांगरभूंय-गोवा” चा “भंगार अड्डा” केला आहे. फोंडा येथील पेट्रोल पंपापासून अवघ्या काही मीटर अंतरावर असलेल्या भंगारअड्ड्याला लागलेल्या आगीमुळे राज्यभरातील बेकायदेशीर उद्योगांवर सरकारी यंत्रणेचे पूर्ण दुर्लक्ष आणि नियंत्रणाचा अभाव दिसून येतो, असा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला आहे.
शुक्रवार, 5 मे 2023 रोजी फोंडा येथील भंगारअड्ड्याला लागलेल्या भीषण आगीच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी पिळर्ण औद्योगिक वसाहत आणि गोव्यातील इतर भागात लागलेल्या आगीपासून भाजप सरकारने अद्याप कोणताही धडा घेतलेला नाही हे स्पष्ट होते.
सरकारी अधिकारी “मिशन टोटल कमिशन” चे धोरण पूढे नेण्यासाठी केवळ इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये व्यस्त आहेत. गेल्या विधानसभेच्या अधिवेशनात विरोधकांनी गंभीर चिंता व्यक्त करूनही गोव्यातील बेकायदेशीर आग प्रवण स्क्रॅपयार्ड आणि इतर आस्थापनांवर कारवाई करण्यासाठी भाजप सरकारने काहीच केले नाही हे धक्कादायक आहे, असे युरी आलेमाव यांनी नमूद केले.
विधानसभेत प्रश्न विचारले जातात व बाहेर आंदोलने केली जातात तेव्हा सरकार केवळ आश्वासने देवून वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न करते. भाजप सरकार गोव्यातील गुन्हेगारी माफियांना प्रोत्साहन देत असल्याचे स्पष्ट आहे आणि त्यामुळेच आगीचे कारण बनणाऱ्या बेकायदेशीर आस्थापनांवर कोणतीही कारवाई केली जात नाही, असा दावा युरी आलेमाव यांनी केला आहे.
काँग्रेस पक्षाने यापूर्वीच विविध आंदोलने सुरू केली आहेत आणि बेफिकीर जवळपास पाच सरकारी खात्यांना कॅमेरासमोर उघड केले आहे. सरकारला जाग न आल्यास आम्ही आंदोलन अधिक तीव्र करू. यातून कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा युरी आलेमाव यांनी दिला आहे.