पिळर्ण येथील बर्जर बेकर पेंट कंपनीला भीषण आग
पिळर्ण येथील गोवा औद्योगिक वसाहतीत बर्जर बेकर पेंट या खासगी कंपनीला भीषण आग लागली आहे. सुदैवाने या आगीत जीवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. तथापि, आग इतकी मोठी आहे की लांबूनही आकाशातील धुराचे लोट दिसून येत आहेत.
दुपारी साडेतीन वाजता ही आग लागल्याचे समजते. आग लागल्याचे लक्षात आले तेव्हा कंपनीत मॅन्युफॅक्चरिंगचे काम सुरू होते. सुमारे 100 कामगार कंपनीत काम करत होते. आग लागल्याचे लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी अलार्म वाजवून सर्वांना सतर्क केले. सुदैवाने कर्मचाऱ्यांपैकी कुणालाही काहीही दुखापत झालेली नाही. आमदार अॅलेक्स रेजिनाल्ड, पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन हे घटनास्थळी उपस्थित आहेत.
या आगीत बर्जर पेंट कंपनीचे प्रोसेसिंग युनिट जळून खाक झाल्याचे समजते. माल घेऊन आलेला ट्रकदेखील या आगीच्या विळख्यात सापडला. आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून केले जात आहेत. पिळर्ण, पर्वरी, म्हापसा, पणजी, कुंडई, फोंडा, कुडचडे, मडगाव येथील अग्निशमन केंद्रातून पाण्याचे 40 बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.
तथापि, आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली असून आग विझविण्याचा प्रयत्न केला जात आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीची तीव्रता मोठी आहे. बर्जर बेकर पेंट कंपनीत विविध रंगांची उपलब्धता असते. रंगांमध्ये विविध केमिकल्सचा वापर होत असतो. त्यामुळेच आग मोठ्या प्रमाणात भडकली असावी, अशी चर्चा घटनास्थळी होती.