पणजीचे माजी उपमहापौर रुद्रेश चोडणकर यांचे निधन
पणजी :
पणजी महापालिकेचे माजी महापौर रुद्रेश चोडणकर (वय 52) यांचे दीर्घ आजाराने दोनापावला येथील खासगी रुग्णालयात शुक्रवारी पहाटे निधन झाले. चोडण येथील मूळ रहिवासी असल्याने त्यांच्या पार्थिवावर त्या ठिकाणी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
दिवंगत आमदार विनायक चोडणकर यांचे ते पुत्र होते. महापालिकेचे नगरसेवक असताना त्यांनी पणजीत मोठा मित्रपरिवार निर्माण केला होता. मळ्यातून ते तीनवेळा महापालिकेवर निवडून गेले. काँग्रेसचे ते निस्सिम कार्यकर्ते होते, त्यांनी 2022 ची विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली होती. मागील काही महिन्यांपासून ते आजाराने त्रस्त होते, दोनापावला येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव मळ्यातील घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले.
याप्रसंगी मंत्री बाबूश मोन्सेरात, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, महापौर रोहित मोन्सेरात, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर, माजी महापौर तथा नगरसेवक उदय मडकईकर, माजी महापौर तथा नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो, जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धेश नाईक, उत्पल पर्रीकर यांनी अंत्यदर्शन घेतले.
दुपारी चोडण येथील घरी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी नेण्यात आले. अंत्यसंस्कारावेळी सर्व स्तरातील लोकांची गर्दी होती. रुद्रेश यांच्या पश्चात पत्नी व पाच वर्षाचा पुत्र असा परिवार आहे.