‘ महात्मा गांधी आणि शास्त्री यांची विचारधारा आणि तत्त्वे पुढे नेणार’
पणजी :
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी नेहमीच सत्य, अहिंसा आणि साधेपणाचा मार्ग स्वीकारला. दोन्ही महान नेत्यांनी भारताच्या निर्मितीत आपले योगदान दिले. आम्ही त्यांच्या विचारसरणीचे अनुसरण करू असे उद्गार गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी काढले.
काँग्रेस भवनात गांधी जयंती आणि शास्त्री जयंती सोहळ्यात ते बोलत होते, या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, हळदोणचे आमदार अॅड. कार्लोस अल्वारेस फरैरा, वरिष्ठ उपाध्यक्ष एम के शेख, माजी उपसभापती शंभू भाऊ बांदेकर आदी उपस्थित होते.
आमचे नेते राहुल गांधी “भारत जोडो” यात्रेत लाखो लोकांना बरोबर घेवून कन्याकुमारी ते काश्मीर चालत आहेत. ही यात्रा महात्मा गांधींच्या शिकवणुकीनुसार भारताला जोडण्यासाठी आहे. भारत एक राहण्यासाठी आपण यात्रेला पाठिंबा दिला पाहिजे, असे अमित पाटकर म्हणाले.
संवेदनाशून्य गोवा सरकारने गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला पाणी दरात 5 टक्के वाढ जाहीर केली हे अत्यंत दुर्दैवी आहे. महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांनी आपले जीवन गोरगरीबांची मदत आणि उन्नतीसाठी समर्पित केले. आपण एकत्र येऊन गरिबांच्या हक्कासाठी लढले पाहिजे. हीच ह्या दोन महान नेत्यांना खरी आदरांजली असेल, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी माजी उपसभापती शंभूभाऊ बांदेकर, वरिष्ठ उपाध्यक्ष एम के शेख, मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनीही भाषण करून महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. काँग्रेस नेते विजय भिके यांनी सूत्रसंचालन केले तर आर्कीटेक्. तुलियो डिसोजा यांनी आभार मानले.
तत्पूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या फोटोंना पुष्पहार अर्पण करून सर्व कॉंग्रेसजनानी आदरांजली वाहिली.