18 पासून राज्यात कार्निव्हल; 8 मार्चपासून शिगमोत्सव
गोव्यात अकर्षणाचा केंद्रबिंदू असलेले कार्निव्हल आणि शिगमोत्सव आता लवकरच सुरू होणार आहे. यासाठी आज पर्यटन विभाग, गोवा पोलीस, अग्निशमन दल यांची बैठक पार पडली.
यावरून यंदाच्या कार्निव्हल आणि शिगमोत्सवासाठीच्या आवश्यक सूचना पत्रकार परिषदेत पर्यटन विभागाचे संचालक निखिल देसाई यांनी दिल्या.
2023 चे कार्निव्हल 18 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. यामध्ये 4 मुख्य ठिकाणे असून इतर 2 ठिकाणेही असणार आहेत. यंदा उत्कृष्ट कार्निव्हल फ्लोट आणून उत्सवाची शोभा वाढवण्याचे आमचे ध्येय आहे. याबाबत आम्ही प्रत्येक आयोजकांना तशा सूचना केल्या असल्याचे देसाई यांनी सांगितले.
कार्निव्हल परेडसाठी आयोजकांना मार्ग ठरवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी गोवा सरकार प्रयत्नशील असणार आहे. प्रामुख्याने पारंपरिक मार्गांचीच निवड करण्यात येणार असून याबाबत आयोजकांनी संबंधित जिल्हाधिकारी आणि पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक आहे.
शिगमोत्सवास हा गोव्याची संस्कृती दर्शवणारा एक महत्वाचा उत्सव आहे. यंदा शिगमोत्सव 8 मार्चपासून सुरू होणार आहे. यामध्ये परेडसाठी फोंडा, वास्को, म्हापसा आणि पणजी ही मुख्य शहरे असणार आहेत. त्याचबरोबर इतर 17 ठिकाणेही शिगमोत्सवासाठी असणार आहेत.
कार्निव्हलप्रमाणेच शिगमोत्सवासाठीही आयोजकांना मार्ग निवडण्याची आणि त्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी आणि पोलिसांची परवानगी घेण्याची सूचना करण्यात आली आहे.
यावर्षी शिगमो परेडसाठी काही सक्तीचे नियम लावण्यात आले आहेत. उच्च न्यायालयातर्फे रात्री 10 नंतर संगीत वाजवण्यावर बंदी असल्याने शिगमो परेडसाठीही हा नियम लागू करण्यात आला आहे.
यासाठी सर्व फ्लोट्स, कलाकार आणि संघांना वेळेतच येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 10 नंतरही जर संगीत सुरू असले तर ते ताबडतोब बंद करण्यात येईल असा इशारा देसाई यांनी दिला.
यानंतर कमिटी अधिकाऱ्यांनी सांगितले की, शिगमो परेड 4 वाजता सुरू होणार असून परेडमध्ये सहभागी असलेल्या सर्व संघांनी वेळेतच हजर राहणे अनिवार्य असणार आहे. उशिरा येणाऱ्या संघांना परवानगी देण्यात येणार नसून जे कुणीही पोलिसांचे ऐकणार नाहीत त्यांना परेडमधून अपात्र ठरवण्यात येणार आहे. या सर्व गोष्टींची काळजी आयोजकांनी घेणे गरजेचे आहे.