गोव्याचा 62 वा मुक्तिदिन साजरा होत आहे. पोर्तुगिजांच्या 450 वर्षाहून अधिक जुलमी राजवटीच्या जोखडातून 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा मुक्त झाला. भारतीय लष्करी सैन्याने केलेल्या ऑपरेशन विजय नंतर गोव्याने स्वातंत्र्याचा सूर्य पाहिला. गोवा विद्यापीठात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देशाचा ध्वज फडकवून सर्व गोमन्तकीयांना मुक्तिदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी गोव्यातील जनतेला उद्देशून आपले विचार व्यक्त केले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे जाणून घेऊया.
1. दरडोई उत्पन्नात गोवा देशात पहिल्या क्रमांकावर आहे.
2. राज्यात येणाऱ्या पर्यटकांना त्रास देणाऱ्या त्यांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात राज्य सरकार कठोर कारवाई करणार.
3. टॅक्सी चालकांची दादागिरी आणि गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही. टॅक्सी व्यवसायिकांनी पर्यटनाचा भाग व्हावे आणि त्यासाठी सहकार्य करावे.
4. राज्यातील बेरोजगारीचा दर कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. येत्या वर्षांत राज्यात रोजगार निर्माण करण्यावर आम्ही लक्ष केंद्रीत करतोय. तसेच, महिला सशक्तीकरण या मुद्यावर देखील आम्ही प्रामुख्याने काम करत आहोत.
5. राज्याच्या प्रगतीचा साक्षिदार होणं माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपण गोल्डन गोवा या स्वप्नाच्या जवळ जात आहोत.
6. गोवा सरकारने कृषी विद्यापीठ सुरू करून राज्यातील विद्यार्थ्यांना शेती क्षेत्रातील शिक्षण आणि रोजगार उपलब्ध करून दिले. जॉब फेअरचे यशस्वी आयोजन केले.
7. जमीन हडप प्रकरणात SIT स्थापन करून योग्य तपासाची सूचना दिल्या आहेत. तसेच, राज्यातील खाण व्यवसाय देखील व्यवस्थिपणे सुरू होत आहे. केंद्र सरकारने करात सूट दिल्याने त्याचा राज्य सरकारला फायदा होईल.
8. ‘देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देव लागतो’ या सावकरांच्या वाक्याची आठवण देखील यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी केली. देशाच्या जडणघडणीत गोव्याचे योगदान असणे खूप महत्वाचे आहे.