‘भाजप सरकारने अनुसूचित जमातीच्या राजकीय आरक्षणाचे राजकारण केले’
पणजी:
“एसटी समुदायासाठी जागांच्या आरक्षणाची केवळ घोषणा केल्याने ख्रिश्चन गावडा समुदायाचा पाठिंबा मिळेल. यामुळे दक्षिण गोवा लोकसभा निवडणुकीत पक्षाला विजय मिळवून देण्यात मदत होईल.” मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 4 जुलै 2023 रोजी गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलेल्या पत्रातील हा मजकूर आज विधानसभेत देण्यात आला. सदर पत्रावरुन भाजप सरकारला एसटी आरक्षणाचे राजकारण करुन केवळ राजकीय फायदा घ्यायचा होता हे स्पष्ट झाले आहे, असा सणसणाती आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला आहे
आदिवासी कल्याण खाते असलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेतील प्रश्नांच्या लेखी उत्तरांना दिलेल्या कागदपत्रांचा संदर्भ देत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, डॉ. प्रमोद सावंत यांनीच भाजपचा छुपा अजेंडा उघड केला आहे.
भाजप नेहमीच अनुसूचित जमाती विरोधी राहिला आहे हे सिद्ध करणारी विविध उदाहरणे आहेत. एसटीला राजकीय आरक्षण देण्यासाठी त्यांनी जवळपास 11 वर्षे काहीही केले नाही. अनुसूचित जमातींना राजकीय आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर चालू अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांत सरकारने प्रश्नोत्तराचा तास तहकूब करण्यास भाग पाडले. युरी आलेमाव म्हणाले की, एसटीच्या कल्याणासाठी केंद्रीय निधी गेल्या अनेक वर्षांपासून वापरावीना परत जातो.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पाठवलेले पत्र म्हणजे एसटी समाजाच्या तसेच काँग्रेस पक्षाच्या दबावाला बळी पडून केवळ भाजपची पत सांभाळण्याची कसरत होती. पत्रातील मजकूरच भाजपचा संधिसाधूपणा उघड करतो, असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
गोव्यातील अनुसूचित जमाती समुदायाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे असे सांगून युरी आलेमाव म्हणाले की, 2027 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी गोव्यातील अनुसूचित जमातींना राजकीय आरक्षण देण्यासाठी प्रलंबित असलेला प्रश्न सोडवण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी आम्ही आमचे प्रयत्न सुरू ठेवू.