
गोवा पर्यटन विभागातर्फे ‘या’ दिवशी होणार ‘सांजाव’
पर्यटन विभागातर्फे सांजावचे भव्य आयोजन करण्यात येत आहे. २४ जून (सकाळी १०- रात्री १०) रोजी हेलिपॅड धौजी-एला ओल्ड गोवा येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. पारंपरिक संगीत, नृत्य, गोव्याचे चविष्ट खाद्यपदार्थ असा हा उत्साहपूर्ण कार्यक्रम असेल.
पर्यटन विभागाचे संचालक आणि जीटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सुनील आंचिपाका, आयएएस म्हणाले, “संत जॉन द बॅप्टिस्ट यांचा सन्मान करण्यासोबतच या उत्सवातून सामाजिक सलोखा निर्माण करणे आणि निसर्गसौंदर्य तसेच पावसाळा साजरा करणे हाही उद्देश असतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही स्थानिक आणि पर्यटकांना सांजाव महोत्सवात धमाल करण्यासाठी, या कार्यक्रमांचा आनंद लुटण्यासाठी एकत्र आणणार आहोत.”
सांजाव हा एक पारंपरिक गोवन उत्सव आहे. संत जॉन द बॅप्टिस्ट यांच्या सन्मानाप्रित्यर्थ प्रचंड उत्साहात हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवात विविध प्रकारचे कार्यक्रम सादर होतील. महोत्सवाच्या दिवशी लॉरी, ज्युनिअर रेगन, अकी, अवितो, पेर्शिल, किंबर्ली आणि डॉ. स्टॅसी यांचे कोंकणी कार्यक्रम होतील. तसेच 24k, लायनक्स, क्रिमसन टाईड, आर्चिस आणि शाइन ऑन यांचे संगीत परफॉर्मन्स सादर होतील. त्याशिवाय, डीजे नवीन, डीजे एरन आणि डीजे यश यांचे अफलातून सेट्स असतील. याचसोबत या कार्यक्रमात सांस्कृतिक मनोरंजनाचे कार्यक्रम, पारंपरिक गोवन गाणी आणि नृत्य, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि रेन डान्सही असेल.
यंदाच्या महोत्सवात अभ्यागतांना या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत समुदायासाठीच्या विविध स्पर्धांमध्येही सहभागी होता येईल. बेस्ट कोपेल स्पर्धा, बेस्ट सांजाव आऊटफिट स्पर्धा-वैयक्तिक/जोडपे, बेस्ट सांजाव आऊटफिट स्पर्धा-कुटुंब, बेस्ट सांजाव आऊटफिट-पारंपरिक गट, बेस्ट पारंपरिक पाककला स्पर्धा आणि पॉट ब्रेकिंग आणि कोकोनट रोलिंग अशा धमाल स्पर्धा यात आहेत.
कॅथलिक परंपरांची मुळे जपणाऱ्या आणि पावसाळ्याचा नैसर्गिक नाद आपल्यात सामावून घेणाऱ्या या महोत्सवातून धार्मिक उत्साह, सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक सलोखा जपला जातो. स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमध्ये पारंपरिक पद्धती आणि परंपरांविषयी आपुलकी निर्माण व्हावी यासाठी पर्यटन विभाग प्रयत्नशील आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून गोव्याच्या अनोख्या आणि उत्साही परंपरा जगासमोर आणून, गोव्यातील प्रेमळ आणि अस्सल आदरातिथ्य, बहूरंगी, बहूढंगी उत्साह अनुभवण्यासाठी पर्यटकांना आमंत्रित केले जात आहे.