‘हसता हा सवता’ होणार मनोरंजन
नवनवीन कलात्मक अनुभूती निर्माण व्हाव्यात व नव्या जाणिवा असलेला प्रेक्षक घडावा या हेतूने आशय–विषयाची नवता घेऊन नवी नाटकं रंगभूमीवर येऊ घातली आहेत. मनोरंजनासोबत विचार करायला प्रवृत्त करणारा असचं एक वेगळ नाटक रंगभूमीवर येऊ घातलं आहे. अभिराम भडकमकर लिखित आणि कुमार सोहोनी दिग्दर्शित ‘हसता हा सवता’ या नव्या विनोदी नाटकाचा शुभारंभ १७ जूनला दु. ४ वा. दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले येथे होणार आहे. मोरया थिएटर्स निर्मित आणि वेदान्त एण्टरटेन्मेंट प्रकाशित या नाटकात प्रियदर्शन जाधव मध्यवर्ती भूमिकेत असून त्याच्यासोबत अमोल बावडेकर, अश्विनी जोशी, श्रद्धा पोखरणकर, प्रसाद दाणी हे कलाकार दिसणार आहेत. या नाटकाची निर्मिती भाऊसाहेब भोईर यांनी केली असून सुत्रधार भैरवनाथ शेरखाने आहेत.
या नाटकाची संकल्पना महात्मा फुले यांच्या एका वाक्यावर आधारलेली आहे. एकमेकांवर ‘मालकी हक्क’ गाजवण्यापेक्षा प्रेम करू असा विचार यात मांडण्यात आला आहे. कौटुंबिक आशय फँटसी पद्धतीने मांडत लेखक अभिराम भडकमकरआणि दिग्दर्शक कुमार सोहोनी ही जोडगोळी ‘हसता हा सवता’ या नाटकातून प्रेक्षकानां काहीतरी वेगळं देणार हे नक्की.
या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे कुमार सोहोनी यांच्या दिगदर्शनाची ४९वर्षे पूर्ण झाली असून ५०व्या वर्षातले हे पहिलेच नाटकआहे. नुकताच सांस्कृतिक विभागाचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. बऱ्याच वर्षानी ते विनोदी नाटकाचे दिग्दर्शन करत आहेत. नाटकाची प्रकाशयोजना ही त्यांचीच आहे. पुरुषोत्तम बेर्डे संगीत देतायेत. नेपथ्य बाबा पार्सेकर यांचे आहे. अभिनेता प्रियदर्शन जाधव याचे २५ वे नाटकं आहे. एकंदरीतच विषयापासून ते सादरीकरणापर्यंत चांगली भट्टी असल्यामुळे ‘हसता हा सवता’ हे नाटक प्रेक्षकांचे दिलखुलास मनोरंजन करेल असा विश्वास नाटकाच्या संपूर्ण टीमने व्यक्त केला आहे.