‘पंकजा मुंडेंनी स्वतःचा पक्ष काढावा’
औरंगाबाद :
एआयएमआयचे (AIMIM) प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना भाजपातून बाहेर पडून स्वतःचा स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याचं आवाहन केलं. तसेच त्यांनी असं केल्यास राज्याच्या राजकारणात भूकंप होईल, असं वक्तव्य केलं. यावर आता केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिलंय. पंकजा मुंडे इम्तियाज जलील यांना प्रतिसाद देतील असं वाटत नाही, असं मत रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं. ते औरंगाबादमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.
रावसाहेब दानवे यांनी पंकजा मुंडे यांची नाराजी आणि जलील यांनी त्यांना स्वतंत्र पक्ष काढण्याबाबत केलेलं आवाहन यावरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “राजकारणात दुसऱ्यात कसा खोडा घालता येईल असा प्रयत्न प्रत्येकजण करत असतो. इम्तियाज जलील म्हटल्यानंतर पंकजा मुंडे त्याला प्रतिसाद देतील असं नाही.
“पंकजा मुंडे भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. गोपीनाथ मुंडे भाजपाचे संस्थापक सदस्य होते. त्यामुळे पंकजा मुंडे कुणाच्याही बोलण्यावर काही निर्णय घेतील असं नाही. त्या पक्षाच्या राष्ट्रीय चिटणीस आहेत. पक्ष योग्य वेळी त्यांचा विचार करेल याची मला खात्री आहे,” असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.
एकनाथ खडसे यांच्या उमेदवारीबाबत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, “एकनाथ खडसे यांना विधान परिषद उमेदवारी न दिल्यास निवडणूक बिनविरोध करण्याचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडून त्यांना देण्यात आला नाही. कारण देवेंद्र फडणवीस आणि मी बुधवारी (१५ जून) सोबत होतो.”