शफालीची टीम इंडिया ठरली विश्वविजेती
दक्षिण आफ्रिकेत खेळवल्या गेलेल्या पहिल्या-वहिल्या १९ वर्षांखालील वर्ल्डकप स्पर्धेचे विजेतेपद भारताच्या 19 वर्षांखालील महिला संघाने मिळवले आहे. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात 19 वर्षांखालील इंग्लंड संघाला 7 विकेट्सने पराभूत करत भारतीय संघाने वर्ल्डकप ट्रॉफीवर नाव कोरले.
या अंतिम सामन्यात इंग्लंडने भारतासमोर 69 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग भारताने 14 षटकात पूर्ण केला आणि विश्वविजेतेपद आपल्या नावावर केले.
या सामन्यात इंग्लंडने दिलेल्या 69 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने कर्णधार शफाली वर्मा आणि श्वेता सेहरावत यांच्या विकेट्स पहिल्या 4 षटकातच गमावल्या होत्या. शफालीला 15 धावांवर खेळत असताना तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हनाह बेकरने बाद केले. त्यानंतर चौथ्या षटकात श्वेता केवळ 5 धावा करून ग्रेस स्क्रिव्हन्सच्या गोलंदाजीवर बाद झाली.
पण यानंतर गोंगाडी त्रिशा आणि सौम्या तिवारी यांनी तिसऱ्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी रचली आणि भारताचा विजयाचा मार्ग सुकर केला. मात्र भारताला केवळ विजयासाठी तीन धावांची गरज असताना त्रिशा 24 धावांवर बाद झाली. तिला ऍलेक्सा स्टोनहाऊसने बाद केले.
मात्र त्यानंतर सौम्याने विजयी धाव काढत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सौम्या 24 धावांवर नाबाद राहिली.
तत्पूर्वी, भारतीय संघाची कर्णधार शफालीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला योग्य ठरवत भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. भारतीय गोलंदाज अर्चना देवी आणि तितास साधू यांनी इंग्लंडला सुरुवातीलाच मोठे धक्के दिले. या दोघींनी केलेल्या शानदार गोलंदाजीमुळे इंग्लंडने 7 षटकांच्या आत 22 धावांवर 4 विकेट्स गमावल्या होत्या.
सुरुवातीलाच मिळालेल्या या धक्क्यांनंतर इंग्लंडचा संघ सावरू शकला नाही आणि त्यांनी नियमित कालांतराने विकेट्स गमावल्या. त्यामुळे 17.1 षटकातच इंग्लंडचा संघ 68 धावांवर सर्वबाद झाला.