google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
महाराष्ट्रसातारा

जिहे कटापूर योजनेच्या गौण खनिजावर अधिकाऱ्यांच्या संगनमताने डल्ला?

सातारा (महेश पवार) :

सातारा जिल्ह्यातील दुष्काळी माण व खटाव तालुक्यांसाठी अत्यंत महत्वकांक्षी असलेल्या जिहे – कटापूर उपसा सिंचन योजनेचं काम सुरु झाल्यापासून ही योजना कोणत्या -ना – कोणत्या कारणाने सातत्याने चर्चेत राहिली आहे. ही योजना पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असली तरी योजनेवर पाटबंधारे प्रशासनापेक्षा राजकीय नेत्यांचा वरचष्मा अधिक दिसून आला आहे. या योजनेचं काम सुरू असताना मोठ्या प्रमाणावर निघालेलं गौणखनिज लुटारुंच्या हाती जणू सोन्याची खाणच लागली. यात अनेकांनी आपलं आयुष्यचं पिवळं करून घेतलं.

गौण खनिजावर नेमका कुणी डल्ला मारला? पाटबंधारे विभाग अधिकाऱ्यांच्या गुपचिळीचं गौडबंगाल काय, असे अनेक प्रश्न आता नागरिक उपस्थित करीत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यास लुटारुंची मोठी पोलखोल होवू शकेल, असा ठाम विश्वास नागरिकांना वाटत आहे.


योजनेच्या कामासाठी शासनाने 1000 कोटी पेक्षा जास्त निधी खर्च केला आणि ही योजना कार्यान्वित केली. परंतु ही योजना अंमलात आणत असताना या योजनेसाठी भुयारी मार्गाने पाणी वर्धनगड घाटातून नेर तलावात आणण्यात आले व नेरमधून माण तालुक्यात नेण्यात आले. परंतु दरम्यानच्या काळात पाणी नेण्यासाठी खोदण्यात आलेल्या भुयारी योजनेचं हजारो ब्रास निघालेले गौण खनिज परिसरातील राजकीय पुढाऱ्यांच्या क्रशरवर पाटबंधारे विभागाच्या काही अधिकाऱ्यांच्या कृपाआशिर्वादाने जात असल्याची जोरदार चर्चा माण व खटाव तालुक्यात असून, त्या बदल्यात अधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी फक्त मलिदाच नव्हे तर महागडी घड्याळं, मोबाईल, महागड्या गाड्या भेट दिली असल्याची जोरदार चर्चा तालुक्यात ऐकायला मिळतेय.

गेल्या दोन दिवसांपासून महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारला असून जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणी लक्ष घालून संबंधितांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी दबक्या आवाजात परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

माण तालुक्यातील नवलेवाडी परिसरात जिहे कटापूर योजनेच्या चौदा किलोमीटरचा टप्पा पार करून  खटाव तालुक्यातून पाणी माण तालुक्यात पोहचले खरं पण, नवलेवाडीत निघालेल्या बोगद्यातून काढलेलं गौण खनिज गेले कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या परिसरात अनेक क्रशर असून यामुळे या परिसरातील प्रदुषणामुळे शेतकरी देखील त्रस्त झाले आहेत.

हे क्रशर कायदेशीर की बेकायदेशीर हा विषय लांबचा, पण या क्रशरला येणारे रॉ मटेरिअल नेमकं कुठून आलं यांची जरी महसूल विभागाने पडताळणी केली तर जिहे कटापूर योजनेतून निघालेल्या गौण खनिजाचे खरे लुटारू समोर येतील. मात्र स्थानिक प्रशासनातील अधिकारी व पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांची मिलीभगत असल्याचा संशय नागरिक व्यक्त करीत आहेत. शासकीय मालमत्तेची लुटप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी आता स्वतः लक्ष घालून संबंधितांवर चौकशीअंती कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!