
मडगाव : मडगांवचो आवाज आणि युवा नेते प्रभव नायक यांनी गोव्याचे मुख्यमंत्री व गोवा मनोरंजन संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत यांना पत्र लिहून २५ ऑगस्ट २०२५ रोजी मडगावात के. वैकुंठ यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता एका विशेष स्मृती कार्यक्रमाने करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
२५ ऑगस्ट १९२५ रोजी मडगाव येथे जन्मलेले वैकुंठ कुंकळयेकर, के. वैकुंठ या नावाने प्रसिद्ध होते. भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत कुशल सिनेमाटोग्राफर म्हणून त्यांची ख्याती होती. सीता और गीता या अजरामर हिंदी चित्रपटासाठी त्यांनी छायाचित्रण केले असून, त्यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त झाला. त्यांना राष्ट्रपती पदकासह अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय सन्मान प्राप्त झाले.

इतकी मोठी चित्रपटसृष्टीतील कामगिरी असूनही, आणि मडगाव हे त्यांचे जन्मस्थान असतानाही, त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात गोवा सरकारतर्फे कोणताही अधिकृत कार्यक्रम झाला नाही, ही दु:खद बाब असल्याचे प्रभव नायक यांनी पत्रात नमूद केले आहे. इफ्फी-२०२४ दरम्यान त्यांना गौरवण्याचा प्रस्ताव अमलात आणला गेला नाही आणि मडगावच्या रवींद्र भवननेही त्यांच्या सन्मानार्थ कोणताही कार्यक्रम आयोजित केलेला नाही, असे प्रभव नायक यांनी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले आहे.
मडगांवचो आवाजतर्फे सरकारकडे २५ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी सीता और गीता या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आणि त्यासोबत एक सांस्कृतिक कार्यक्रम मडगावात आयोजित करण्याची विनंती केली आहे. हा कार्यक्रम गोवा मनोरंजन संस्था (ईएसजी) मार्फत स्थानिकांच्या समन्वयाने आयोजित करावा, अशी सूचनाही करण्यात आली आहे.
“हा केवळ एका महान सिनेमाटोग्राफरला श्रद्धांजली वाहण्याचा क्षण नाही, तर गोव्याच्या सुपुत्राने चित्रपट माध्यमातून मिळवलेल्या जागतिक ओळखीचा अभिमानाने गौरव करण्याची संधी आहे,” असे प्रभव नायक यांनी म्हटले आहे. “ही केवळ के. वैकुंठ यांची स्मृती जपण्याची बाब नाही, तर गोव्यातील प्रत्येक क्षेत्रातील प्रतिभेचा सन्मान करण्याची आठवणही आहे”, असे प्रभव नायक यांनी म्हटले आहे.
मडगांवचो आवाजने सरकारला कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असून, के. वैकुंठ यांच्या योगदानाचा सन्मान त्यांच्या जन्मगावी सन्मानपूर्वक केला जाईल, अशी अपेक्षा प्रभव नायक यांनी व्यक्त केली आहे.