- अभयकुमार देशमुख
समतोल नीट ठेवायचा असेल तर पर्यावरणाच्या रक्षणाची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. झाडे न तोडता झाडे लावली पाहिजेत. कारण सध्या ती काळजी गरज आहे. समाजातील अनेक जण आपल्याला पद्धतीने झाडे लावून निर्सगाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र जुन्नर तालुक्यातील एक अवलियाने चक्क पावसाचे पाणी साठावे म्हणून चक्क त्याने स्वतःचा वाढदिवसाच्या दिवशी वन जमिनीमध्ये सुमारे ६० दिवसात ७० चर खोदण्याचा संकल्प पूर्ण केला आहे. त्यातून त्याने आपल्या वाढदिवसाची अनोखी भेट दिली आहे.
जुन्नर वनखात्यात नोकरी करणारा हे वनरक्षक असून जुन्नर तालुक्यातील खोडद हे त्यांचं गाव आहे.त्यांचं नाव रमेश खरमाळे. विशेष म्हणजे रमेश खरमाळे यांनी आपली पत्नी स्वाती यांनी देखील त्यांच्यासोबतीने हा उपक्रम पूर्ण केला आहे. धामनखेल येथील डोंगर माथ्यावर रोज पहाटे जायचे आणि ५ : ३० ते ९ : ३० पर्यंत चर खोदायचे आणि नंतर शासकीय कामावर हजर राहायचे असा खरमाळे यांचा नित्यक्रमच झाला होता.
या पर्यावरणप्रेमी दांपत्याने १५ सप्टेंबर २०२१ रोजी या कार्याला सुरुवात केली. या दिवशी वृक्षारोपण करण्यासाठी १६ खड्डे खोदून या कामाचा शुभारंभ केला आणि दुसऱ्या दिवसापासून जलशोषक चर खोदण्यास सुरूवात केली. चर खोदण्याचे चालू झालेले काम तब्बल ६० दिवस केले. कुठल्याही प्रकारची अडचण आली तरी हे थांबवायचे नाही असा दृढ निश्चय या दाम्पत्याने केला होता. ६० व्या दिवशी जलशोषक चर खोदून रमेश खरमाळे यांना स्वतःच्या वाढदिवसाची भेट निसर्गाला द्यायची होती.
या निसर्गप्रेमी खरमाळे दांपत्याने ६० दिवसांत ३०० तास काम करून ७० चरांची निर्मीती केली आहे. जवळपास ४१२ मीटर लांबीचे चर निर्माण केले आहेत.
या चरांमध्ये ८ लाख लीटर पावसाचे पाणी साचेल व पावसात खड्डे भरले की जमीनीत पाणी जिरले जाईल व जमीनीत ८ लाख लिटर पाण्याच्या पातळीत वाढ होईल. जर वर्षात २० पाऊस झाले तर वर्षाला १ कोटी ६० लाख लिटर पाणी जमीनीत जिरवण्याचा उद्देश सफल होईल. खोदलेल्या चरांच्या ढिगा-यावर कमीत कमी ५०० झाडे लावले जातील व त्या पासून त्या परीसरात जंगल निर्माण होण्यासाठी मदत होईल.असे खरमाळे यांनी सांगितले.
त्यांच्या या उपक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद देखील झाली आहे. याशिवाय खरमाळे यांना अनेक वर्षांपासून निर्सगाची आवड असल्यापासून वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. प्रत्येकाने निर्सगासाठी काही तरी करावे अशी भावना खरमाळे यांनी यावेळी व्यक्त केली आहे.