
‘उदय म्हांबरे यांचे साहित्य नदीप्रमाणे प्रवाही’
कोची :
‘काळीज उसवला’ हे पुस्तक आपण जसजसे वाचत पुढे जातो, तसतसे या पुस्तकाच्या हरेक पानांतून आपल्यापर्यंत आता विस्मृतीच्या पानांआड जात असलेल्या गोव्याच्या आठवणी मन पटलावर उमटत राहतात, आणि आपल्या मुळाकडे जाण्यासाठी प्रवृत्त करतात. आणि ही करामत उदय म्हांबरे यांच्या नदीप्रमाणे ओघवत्या, प्रवाही लेखनशैलीची आहे, असे प्रतिपादन केरळचे राज्यपाल आणि गोवा विधानसभेचे माजी सभापती राजेंद्र आर्लेकर यांनी केले.
उदय म्हांबरे यांच्या ‘काळीज उसवला’ या प्रसिद्ध कोंकणी पुस्तकाचे बालकृष्ण मल्ल्या यांनी मल्याळम भाषेत अनुवादित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन कोची येथे जाहीर कार्यक्रमात केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी मंचावर लेखक उदय म्हांबरे, प्रकाशक विनोद कुमार, मल्याळम भाषेतील ज्येष्ठ लेखक एम के सानू, कार्यक्रमाचे आयोजक पी जी कामत संस्थेचे अध्यक्ष आनंद कामत आणि मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी राजेंद्र आर्लेकर यांनी कोंकणी साहित्याचे आणि त्याचप्रमाणे गोव्याबाहेर स्थायिक झालेल्या मूळ गोमंतकीयांच्या साहित्याचा आढावा घेत असताना, आज इतक्या मोठ्या कालखंडानंतरदेखील गोव्याबाहेर मोठ्या प्रमाणात कोंकणी लिहिली, बोलली आणि जोपासली जात असल्याबद्दल विशेष समाधान व्यक्त केले. जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी गोमंतकीय कोंकणीला विसरत नाहीत, आणि ही खूप अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी लेखक उदय म्हांबरे यांनी प्रस्ताविक केले. तर आनंद कामत यांनी पुस्तकाची ओळख करून देत, पुस्तकावर भाष्य केले.