लोबो दाम्पत्याकडून पोलिसांना कागदपत्रे सादर…
म्हापसा :
पर्रा येथील शेतजमिनीत बेकायदेशीररीत्या मातीचा भराव टाकल्या प्रकरणी आरोप असलेले विरोधी पक्षनेता मायकल लोबो व त्यांची पत्ती आमदार दिलायला लोबो यांना समन्स बजावण्यात आल्यानंतर त्यांनी आज म्हापसा पोलिस स्थानकात उपस्थित राहून त्यासंदर्भातील कागदपत्रे सादर केली. नगर नियोजन अधिनियमांचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात म्हापसा पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
या दाम्पत्यावर टीसीपी कायदा उल्लंघन केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली होती. त्यानुसार आमदार दिलायला लोबो यांनी आज बुधवारी सकाळी म्हापसा पोलिस स्थानकात उपस्थिती लावून स्वत:ची बाजू मांडली. या संदर्भात लोबो दाम्पत्याच्या विरोधात रामा मातोंडकर यांनी तक्रार केली होती.
तिथे सपाट जमिनीवर फार्महाऊस उभारण्यात आले असून तिथे भाज्यांचे उत्पादन घेण्याचे काम सुरू आहे, असे लोबो यांनी म्हापसा पोलिसांना दिलेल्या लेखी उत्तरात स्पष्ट केले आहे. त्या भाज्या स्वत:च्याच हॉटेल्समध्ये वापरण्यात येतील, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.