
गुजराती समाजाचे सामाजिक कार्यात मोठे योगदान : प्रभव नायक
मडगाव :
मडगाव गुजराती समाजाने त्यांच्या विशेष मुलांच्या शाळा संकुलात आयोजित केलेल्या नवरात्री सोहळ्याला उपस्थित राहून मला खरोखरच आनंद झाला व धन्य वाटले. गुजराती समाजाचे समाजकार्यात खूप मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन युवा नेते प्रभव नायक यांनी केले.
गुजराती समाजातर्फे नवरात्रोत्सवाच्या सहाव्या रात्री कार्यक्रमात बोलताना प्रभव नायक यांनी समाजाच्या सर्व सभासदांना त्यांच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी अध्यक्षा सोनल दोशी, उपाध्यक्ष रुषभ सावला, सहसचिव साहिल गोसालिया आदी उपस्थित होते.
आमचे कुटुंब गुजराती समाजाशी जवळचे आहे. माझे आजोबा अनंत उर्फ बाबू नायक यांचे गुजराती समाज सदस्यांशी सौहार्दपूर्ण संबंध होते. हे नाते दृढ ठेवूया आणि मडगावसाठी योगदान देऊया, असे प्रभव नायक म्हणाले.
मडगावमधील गुजराती समाजाच्या उपक्रमांना मी सर्वतोपरी मदत करेन. विशेष मुलांसाठी असलेल्या शाळेला सरकारसह सर्वांच्या पाठिंब्याची गरजव आहे, असे मत प्रभव नायक यांनी व्यक्त केले.
तत्पूर्वी गुजराती समाज समिती सदस्यांनी प्रभव नायक यांचे स्वागत केले. “दांडिया” भेट देवून समितीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रभव नायक यांनी “महाप्रसाद” घेतला तसेच दांडिया आणि गरबा नृत्यात भाग घेतला.