‘या’ दोन एक्सप्रेस थांबणार काणकोणला…
काणकोण रेल्वे स्थानकावर आता आणखी दोन एक्सप्रेस रेल्वेगाड्याही थांबणार आहेत. नेत्रावती एक्सप्रेस आणि गांधीधाम एक्सप्रेस या रेल्वेगाड्या आता काणकोण स्थानकावर थांबवण्यास रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. याबाबत स्थानिकांमधून मागणी केली जात होती.
नेत्रावती एक्सप्रेस ही मुंबई ते तिरूअनंतपुरम (केरळ) या दोन स्थानकांदरम्यान धावणारी रेल्वेगाडी आहे. तर गांधीधाम एक्सप्रेस ही गुजरातच्या कच्छमधील गांधीधामपासून तामिळनाडूतील नागरकोईल या स्थानकांदरम्यान धावते.
नेत्रावती एक्सप्रेस रेल्वे 2 एप्रिलपासून तर गांधीधाम एक्सप्रेस 8 एप्रिलपासून काणकोण रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहेत. या संदर्भात रेल्वे बोर्डाचे संयुक्त संचालक विवेक कुमार सिन्हा यांनी आदेश काढला आहे.
मात्र काणकोण रेल्वे स्थानकावर रेल्वे तिकीटांच्या खपावर लक्ष ठेवून पाच महिन्यानंतर रेल्वे बोर्डाला अहवाल कळविण्याचे निर्देश रेल्वे अधिकाऱ्यांना दिले आहेत. काणकोणमधील जेष्ठ नागरिक व समविचारी नागरिकांनी रेल्वे थांबण्यासाठी गेल्या वर्षापासून निवेदने दिली होती.
त्याचप्रमाणे आंदोलने छेडली होती. गेल्या महिन्यात गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर तसेच नगराध्यक्ष रमाकांत नाईक-गावकर व शंभा नाईक-देसाई यांनी दिल्ली येथे जाऊन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती.
त्यावेळी रेल्वे मंत्र्यानी सभापतींना रेल्वे काणकोण स्थानकावर थांबवण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता आता करण्यात आली आहे.