
‘विरोधी पक्ष एअरलाईन्सचे पायलट उड्डाणासाठी सज्ज, मात्र ग्राउंड क्रू नाही’
राजकीय विश्लेषक विशाल पै काकोडे यांची उपरोधात्मक टीका
मडगाव :
गोव्यातील विरोधी पक्षनेत्यांच्या कामकाजावर तयारी, नेतृत्व आणि मूलभूत प्रशासकीय रचनेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. एक महत्त्वाची घटनात्मक जबाबदारी देण्यात आलेली असतानाही, विरोधी पक्षनेते १५ दिवसांच्या विधानसभा अधिवेशनाला आवश्यक सहाय्यक कर्मचाऱ्यांविना सामोरे जाणार आहेत. हि बाब गंभीर असून, सुदृढ लोकशाहीसाठी हा गंभीर धोका असल्याचे राजकीय विश्लेषक विशाल पै काकोडे यांनी म्हटले आहे.
“एक घटनात्मक वैमानिक (पायलट) जर क्रूशिवाय उड्डाण घेत असेल, तर ती आत्मविश्वासाची नाही तर इशाऱ्याची घंटा आहे. न एटीसी, न ग्राउंड स्टाफ, न साधने – एकटा माणूस विधानसभेच्या वादळी वातावरणात शिरतोय, हे नेतृत्व नाही, तर भ्रमाचे प्रदर्शन आहे” असा टोला विशाल पै काकोडे यांनी हाणला आहे.
विरोधी पक्षाची भूमिका ही सरकारला जाब विचारणे, जनतेचा आवाज पोचवणे आणि सभागृहातील चर्चेला दिशा देणे अशी अत्यंत महत्त्वाची असते. “जेव्हा विरोधी पक्षनेत्याभोवतीची प्राथमिक रचनाही अस्तित्वात नाही, तेव्हा गोव्याच्या जनतेला काय संदेश दिला जातो?” असा प्रश्न विशाल पै काकोडे यांनी उपस्थित केला.
“विरोधी पक्ष एअरलाईन्स” असे उपरोधिक नाव देत पै काकोडे म्हणाले की, पायलट उड्डाणासाठी सज्ज झालेत, पण क्रू नेमलेला नाही आणि जेव्हा वैमानिक क्रूला नजरअंदाज करतो, तेव्हा गोंधळ अटळ असतो. ही केवळ कार्यपद्धतीतील त्रुटी नाही, तर लोकशाहीसाठी धोक्याची सूचना आहे, असा इशारा त्यांनी दिला.
विरोधी पक्षनेत्याने हे पद वैयक्तिक भूषण म्हणून न पाहता, त्यासोबत येणाऱ्या घटनात्मक जबाबदाऱ्यांचा आदर करावा, अशी मागणी विशाल पै काकोडे यांनी केली. “पॅराशूट तयार ठेवा, कारण हा एकट्याचा एअर शो आता थेट अप्रासंगिकतेच्या ढगात प्रवेश करतोय,” अशा उपहासात्मक शब्दांत विशाल पै काकोडे यांनी निष्कर्ष मांडला.