मडगांवचो आवाजकडून “अस्मिताय वर्स”चा शुभारंभ
मडगांव: ऐतिहासिक जनमत कौलाच्या ६० वर्षांच्या स्मरणार्थ मडगांवचो आवाजकडून वर्षभर चालणाऱ्या उपक्रमांची आखणी करण्यात आली असून ही बाब अत्यंत स्तुत्य असल्याचे उद्गार जनमत कौल चळवळीचे अग्रणी व मडगावचे माजी आमदार अॅड. उदय भेंब्रे यांनी काढले. आजच्या काळात कार्यक्रम आयोजनांवर कोट्यवधी रुपये खर्च होतात, मात्र ते दुसऱ्याच दिवशी विस्मरणात जातात. पुढील पिढ्यांसाठी मैलाचा दगड ठरतील असे उपक्रम आखणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
अॅड. उदय भेंब्रे हे जनमत कौल १९६७ च्या ६० वर्षांच्या स्मरणार्थ मडगांवचो आवाजतर्फे आज सुरू झालेल्या “अस्मिताय वर्स” या उपक्रमाच्या पोस्टर अनावरणप्रसंगी बोलत होते. यावेळी युवा नेते प्रभव नायक व समाजसेवक दत्तराज पै फोंडेकर उपस्थित होते.
जनमत कौल चळवळीशी निगडित समृद्ध वारसा पुढे नेताना अभिमान वाटत असल्याचे सांगताना प्रभव नायक यांनी आपले पणजोबा नरसिंह नायक आणि आजोबा अनंत ऊर्फ बाबू नायक यांच्या ऐतिहासिक योगदानाचा उल्लेख केला. गोव्याची ओळख, भाषा व संस्कृती जपण्यासाठी योगदान देणाऱ्या थोर गोमंतकीयांचा सन्मान मडगांवचो आवाज पुढेही करत राहील, असे त्यांनी सांगितले.
अस्मिताय वर्षाच्या शुभारंभाच्या निमित्ताने मडगांवचो आवाजतर्फे जनमत कौल चळवळीतील हयात असलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन शाल, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ व रोपटे देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी अॅड. उदय भेंब्रे, प्रा. श्याम वेरेंकर, स्मृती अवदी, अरुणा तेलंग, एन. शिवदास, सदानंद काणेकर आणि तोमाझिन्हो कार्दोझ यांचा सन्मान करण्यात आला. या सर्वांनीच गोव्याच्या भवितव्याला दिशा देणाऱ्या ऐतिहासिक जनमत कौल चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
सन्मानित ज्येष्ठांनी प्रभव नायक व मडगांवचो आवाज यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत अस्मिताय वर्षाच्या वर्षभर चालणाऱ्या उपक्रमांमुळे तरुण पिढीला गोव्याची अस्मिता, इतिहास व वारसा समजून घेण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.


