
‘त्या’ कार्यक्रमाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ‘मडगावचो आवाज’ने मागितले स्पष्टीकरण
मडगाव :
मडगावचो आवाज व युवा नेते प्रभव नायक यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लीटस (आयएएस) यांना पत्र लिहून जिल्हाधिकारी कार्यालयात मॉडेल मडगाव या नावाखाली झालेल्या कार्यक्रमाबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.
सदर कार्यक्रमाबाबत शंका उपस्थित करत प्रभव नायक यांनी पत्रातून, सदर कार्यक्रमास दक्षिण गोवा जिल्हाधिकारी, दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक, मडगावचे आमदार, नावेलीचे आमदार, मडगावच्या आमदारांचे कुटुंबीय, भाजप मडगाव मंडळ अध्यक्ष आणि इतर उपस्थित असल्याचा दावा केला आहे. वरिष्ट सरकारी अधिकाऱ्यांच्या सहभागामुळे या कार्यक्रमाला अधिकृत मान्यता मिळाल्याचा भास निर्माण होतो, असे प्रभव नायक यांनी पत्रात नमूद केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना लिहीलेल्या पत्रामध्ये, प्रभव नायक यांनी एका खाजगी संस्थेला महत्वाच्या शासकीय कार्यालयामध्ये खाजगी कार्यक्रम घेण्याची परवानगी कोणत्या अधिकाराखाली देण्यात आली? यासाठी काही शुल्क आकारण्यात आले का? तसेच यासाठी कोणती अधिकृत प्रक्रिया पार पाडण्यात आली का? याचे उत्तर मागितले आहे. जनतेला सदर कार्यक्रमासाठी देण्यात आलेल्या परवानगीचा तपशील जाणून घेण्याचा हक्क आहे, असे प्रभव नायक यांनी सांगितले.
राजकीय संबंध असलेल्या खाजगी संस्थांना शासकीय जागांचा वापर करण्याची परवानगी देणे हा चुकीचा पायंडा पाडणारा निर्णय आहे. यामुळे इतर गट देखील अशा प्रकारच्या मागण्या करु शकतात व शासकीय संस्थांची निष्पक्षता धोक्यात येऊ शकते, असे प्रभव नायक यांनी म्हटले आहे.
प्रभव नायक यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला त्यावर आक्षेप घेतला आहे. सरकारी अधिकारी खाजगी व राजकीय रंग असलेल्या कार्यक्रमाला अधिकृत मान्यता कसे देतात, हा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मडगावचो आवाज व युवा नेते प्रभव नायक यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत सार्वजनिक स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी केली आहे. सरकारी कार्यालये व संसाधने ही करदात्यांच्या पैशातून उभी राहतात आणि त्यामुळे ती लोकांचा विश्वास टिकवणारी निष्पक्ष स्थळे राहिली पाहिजेत, ना की विशेषाधिकार, पक्षपात किंवा राजकीय लाभ घेण्यासाठीचे मंच, असे प्रभव नायक यांनी पत्रात नमूद केले आहे.