केंद्र सरकारकडून डीपीआरला मंजुरी मिळाल्यामुळे आता लवकरच म्हादई प्रकल्पाचे काम सुरू करणार आहोत असे नुकतेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले होते. दरम्यान, आज म्हादई प्रश्नावर बोम्मईंनी दुसरी प्रतिक्रिया दिली आहे.
“म्हादईबाबत गोवा सरकारच्या योजना मला माहीत नाहीत. कायदेशीर सोपोस्कारानंतरच केंद्रीय जल आयोगाने डीपीआर मंजूर केला आहे” असे बोम्मई म्हणाले.
नुकतेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटले होते की, केंद्र सरकारकडून डीपीआरला मंजुरी मिळाल्यामुळे आम्ही आता लवकरच म्हादई प्रकल्पाचे काम सुरू करणार आहोत.
याबाबत गोव्याने कितीही प्रयत्न केले तरी आम्हाला काहीही फरक पडणार नाही. लवादाच्या निवाड्याप्रमाणेच आम्ही प्रकल्पांचे काम हाती घेतले आहे, असे बोम्मई म्हणाले होते.
त्यानंतर आज त्यांनी म्हादई प्रश्नी दुसरी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “म्हादईबाबत गोवा सरकारच्या योजना आम्हाला माहीत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच लवादची स्थापना करण्यात आली.”
“लवादने हायड्रोलॉजिकल आणि इतर बाबींचा अभ्यास केल्यानंतरच आदेश दिला आहे. कर्नाटकच्या कायदेशीर संघर्षानंतरच केंद्रीय जल आयोगाने डीपीआर मंजूर केला आहे” असे वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले आहे.
“गोव्यातील भाजपच्या सरकारला विश्वासात घेऊन कर्नाटकातील तहानलेल्या शेतीला म्हादईचे पाणी देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे त्यासाठी कर्नाटकातील नेत्यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे मी अभिनंदन करतो.
भाजपने या दोन्ही राज्यांतील अनेक वर्षांपूर्वीचा वाद मिटवून म्हादईचे पाणी कर्नाटकला दिले आहे. त्यामुळे कर्नाटकातील काही जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना म्हादईचे पाणी मिळणार आहे.’’ असे वक्तव्य हुबळीतील सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले होते. त्याचे पडसाद गोव्यात उमटले होते.