केंद्रीय जल आयोगाच्या म्हादईबाबतच्या निर्णयाने गोव्यातील राजकारण, समाजकारण ढवळून निघाले आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून म्हादईबाबतच्या निर्णयाचे पडसाद गोव्यात उमटत असून सरकार, विरोधक आणि सर्वसामान्यांमधून विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. दरम्यान, याच मुद्यावर भाजपच्या कोअर गटाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत राज्याचे मंत्रीमंडळ म्हादईबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेईल, असे ठरविण्यात आले आहे.
भाजपच्या कोअर ग्रुपची बैठक शुक्रवारी रात्री झाली. या बैठकीत म्हादई नदीच्या पाण्याबाबतच्या मुद्यासह मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टॅक्सी अॅपबाबतचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी होता. यावेळी पर्यटन मंत्री रोहन खंवटे आणि जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर उपस्थित होते. सूत्रांच्या माहितीनुसार आगामी काही दिवसात राज्याचे सर्व मंत्र्यांचे शिष्टमंडळ म्हादईच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ इच्छिते.
या भेटीमध्ये म्हादईच्या पाण्याबाबत आणि त्यासंदर्भातील विविध प्रोजेक्टबाबत नुकताच केंद्रीय जल आयोगाने दिलेला निर्णय गोवा राज्यासाठी अन्यायकारक आहे, अशी गोमंतकीयांची भुमिका पंतप्रधान मोदींच्या कानावर घालण्यात येणार आहे. तथापि, याबाबतचा अंतिम निर्णय सोमवारच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात येणार आहे, असे कळते.