काँग्रेस खासदार शशी थरूर (shashi tharoor) यांनी गुरुवारी ‘भारत जोडो यात्रे’बाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’ला देशातील जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला. यामुळे सत्ताधारी भाजपा सरकारची झोप उडाली आहे. पण लोकांच्या या प्रतिसादाचं रुपांतर मतांमध्ये करणं, हे पुढील आव्हान आहे. त्यांचं आपोआप मतात रुपांतर होणार नाही, असं विधान शशी थरूर यांनी केलं.
शशी थरूर नुकतंच ‘आंबेडकर : अ लाइफ’ या आपल्या नवीन पुस्तकाचं प्रकाशन करण्यासाठी कोलकाता येथे होते. यावेळी त्यांनी ‘ऑक्सफर्ड बूक स्टोअर’मध्ये १२ ते १५ जानेवारीदरम्यान आयोजित केलेल्या ‘अपीजय कोलकाता लिटररी फेस्टिव्हल’ (AKLF) च्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना थरूर म्हणाले, “भारत जोडो यात्रा ही प्रचंड यशस्वी ठरली आहे. ही यात्रा जिथे-जिथे गेली तिथे लोकांची मनं जिंकली. यामुळे राहुल गांधींची जनमानसात असलेली प्रतिमा सुधारण्यासाठी याचा फायदा होईल. लोकांनी त्यांना वैयक्तिकरित्या मनापासून स्वीकारले आहे. पण आता याचं मतांमध्ये भाषांतर करणे, हे पुढील आव्हान आहे. या लोकांचं स्वयंसिद्धपणे मतात रुपांतर होणार नाही. पारंपरिकपणे काँग्रेसशी संबंधित नसलेल्या लोकांनी भारत जोडो यात्रेला पाठिंबा दिला, ही उत्साह निर्माण करणारी बाब आहे,” असंही थरूर म्हणाले.
भारत जोडो यात्रेच्या यशाला कोविडच्या नवीन उपप्रकारामुळे धोका निर्माण होऊ शकतो का? असं विचारलं असता, थरूर म्हणाले, “आम्ही भारत जोडो यात्रेच्या समाप्तीकडे येत आहोत. २६ जानेवारीला या यात्रेचा समारोप होणार आहे. चीनमध्ये प्राणघातक ठरणारी करोना विषाणूचे व्हेरिएंट भारतात जून/जुलैमध्येच आढळली होती. त्यामुळे कोणतीही मोठी आपत्ती उद्भवली नाही. त्यामुळे आपल्याला घाबरण्याचं कारण नाही. पण २०२०, २०२१ आणि २०२२ मध्ये आपण करोनाच्या जीवघेण्या संकटाला सामोरं गेलो आहोत. त्यामुळे आपण सतर्क राहणे आवश्यक आहे,” असंही थरूर म्हणाले.