google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
महाराष्ट्र

सनातन संस्थेच्या कथित सदस्याच्या घर-गोडाऊनमधून २० बॉम्ब जप्त…

मुंबई उच्च न्यायालयाने पुण्यातील सनबर्न फेस्टीव्हलवर हल्ला करण्यासाठी बॉम्ब तयार केल्याचा आरोप असणाऱ्या सनातन संस्थेच्या कथित सदस्याला जामीन मंजूर केला आहे. आरोपीचं नाव वैभव राऊत असं आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) केलेल्या कारवाईत सनातनचा सदस्य असलेल्या आरोपी वैभव राऊतच्या घरातून ८ बॉम्ब आणि गोडाऊनमधून १२ बॉम्ब जप्त करण्यात आले होते. याशिवाय त्याच्याकडून एक डायरीही जप्त करण्यात आली होती. या डायरीत आरोपीचं हल्ल्याचं नियोजन आणि बॉम्ब तयार करण्याविषयीची तपशीलवार माहिती होती.

न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने आरोपी वैभव राऊतला जामीन मंजूर केला. यावेळी न्यायालयाने आरोपी ५ वर्षांपासून तुरुंगात आहे आणि खटला लवकर पूर्ण होणार नाही या आधारावर हा जामीन मंजूर करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय राऊतच्या अटकेच्या आधी त्याच्याकडून बॉम्ब जप्त करण्यात आले होते असं म्हणत भारतीय पुरावा कायदा कलम २७ चाही आधार न्यायालयाने घेतला.

mumbai-high-court-grants-bail-to-alleged-sanatan-sanstha-member-vaibhav-raut
आरोपी वैभव राऊत

यावेळी न्यायालयाने हेही नोंदवलं की, ज्या घरातून बॉम्ब जप्त करण्यात आले ते घर आरोपीच्या वडिलांच्या नावावर होतं आणि गोडाऊनही आरोपीच्या नावावर नव्हतं. हस्तलेखन तज्ज्ञांचे मत वगळता जप्त करण्यात आलेल्या डायरीला इतर कोणताही दुजोरा नाही.

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने २०१८ मध्ये आरोपी वैभव राऊत आणि इतरांवर कारवाई केली होती. तसेच त्यांच्यावर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले होते. एटीएसच्या म्हणण्यानुसार, आरोपी वैभव राऊत आणि इतर आरोपी भारताला अस्थिर करण्याच्या मोठ्या कटाचा भाग होते. त्यांना काही दहशतवादी कृत्य करून देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्व संपवायची होती.

आरोपी राऊत आणि इतर आरोपी हे सनातन संस्थेचे सक्रीय सदस्य होते. सनातन संस्थेचा हेतू हिंदू राष्ट्र निर्माण करणे हा आहे. यासाठी महाराष्ट्रासह शेजारील राज्यांमध्ये गुप्तपणे दहशतवादी कृत्य करण्यासाठी टोळ्या निर्माण करणे हाही त्यांचा उद्देश होता. त्यांनी पाश्चिमात्य सांस्कृतिक कार्यक्रम असलेला पुण्यातील सनबर्न कार्यक्रम उथळून लावण्यासाठी बॉम्बचा साठा निर्माण केला होता.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!