प्राणप्रतिष्ठेनंतर प्रभू श्रीरामचे पहिले दर्शन कोणी घेतले ?
भव्य…दिव्य…बाल रूप, मोहक स्वरूप…असे अयोध्येतील श्रीरामलल्ला आहे. अनेक वर्षांची प्रतिक्षा संपत अयोध्येत धार्मिक विधीत प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. रामलल्ला गर्भगृहात विराजमान झाले असून त्यांचा पहिली फोटो समोर आला आहे. त्यात भगवान श्रीराम यांच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे. गळ्यात मोत्याचा हार आहे. कानात झुमके आहेत. त्यांच्या हातात सोन्याचे धनुष्य आणि बाण आहे. रामलल्ला यांना पिवळ्या रंगाचे पितांबर नेसवले आहे. सोमवारी दुपारी 12.29 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. रामलल्ला यांच्या डोळ्यावर असणारी पट्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढली आणि कमळाच्या फुलाने पूजन केले. त्यांनीच रामलल्ला यांचे पहिले दर्शन घेतले.
प्राणप्रतिष्ठेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरती केली. त्यानंतर भगवान राम यांच्यासमोर ते नतमस्तक झाले. टीव्हीच्या माध्यमातून देशभरातील कोट्यवधी भाविकांनाही भगवान श्रीराम यांच्या मूर्तीचे दर्शन झाले. त्यानंतर अनेकांना कृत कृत्य झाल्याच्या भावाना आल्या. ‘याची देही याची डोळा, ऐसा देखिला सोहळा’ अशा भावना रामभक्तांच्या झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूजा झाल्यानंतर संपूर्ण मंदिर परिसराची पाहणी केली.
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या गर्भगृहात विराजमान झालेली मूर्ती कर्नाटकातील मूर्तीकार अरुण योगीराज यांनी केली आहे. शालीग्राम शिळेपासून त्यांनी ही मूर्ती तयार केली आहे. शास्त्र आणि धर्मग्रंथात शालीग्राम शिळेचे महत्व आहे. धर्मग्रंथ आणि धार्मिक ग्रंथांमध्ये शालिग्राम शिळा भगवान विष्णूचे रूप मानले गेले आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्री राम हे भगवान विष्णूचे सातवे अवतार मानले आहेत. शालिग्राम शिळा हजारो वर्षे जुनी शिळा आहे. त्यावर चंदन किंवा इतर पूजा साहित्याचा काही परिणाम होणार नाही. मूर्तीच्या चकाकीवर काही परिणाम होत नाही.