RG ने ‘या’ अटी ठेवल्या काँग्रेस समोर…
लोकसभेसाठी अर्ज दाखल करण्याची लगबग सुरु असताना गोव्याच्या राजकारणात नाव ट्विस्ट पाहायला मिळत आहे. राज्यात सर्वात पहिल्यांदा लोकसभा उमेदवार जाहीर केलेला रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्ष काही नरमल्याचे दिसत असून, त्यांनी इंडिया आघाडीसोबत जागा वाटपाबाबत चर्चेची तयारी दर्शवली आहे.
मात्र, आरजीने काँग्रेससमोर तीन अटी ठेवल्या असून, त्यासाठी पाच दिवसांची मुदत देखील दिली आहे.
रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाअध्यक्ष मनोज परब यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर देखील उपस्थित होते.
लोकसभेच्या जागावाटपाबाबत मनोज परब यांनी तयारी दर्शवली. मात्र, परब यांनी यासाठी तीन अटी आघाडीच्या नेत्यांसमोर ठेवल्या आहेत. यात म्हादई नदीच्या संरक्षणाबाबत खात्रीशीर आश्वासन मागितले आहे. तसेच, कोमुनिदाद जागेवरील सर्व बेकायदेशीर बांधकामे हटवली जातील आणि पक्षाने सादर केलेले पोगो बिल स्विकारले जावे अशा अटी त्यांनी आघाडीसमोर ठेवल्या आहेत.
वरील तीन अटी मान्य केल्यास आम्ही आघाडीसोबत जागावाटपाबाबत चर्चा करु, असे वक्तव्य मनोज परब यांनी केले.
आघाडीला अटी मान्य असल्यास येत्या 20 एप्रिलपर्यंत आम्ही प्रतिक्षा करण्यास तयार असल्याचे परब यांनी म्हटले आहे. दरम्यान, गोव्यात 20 तारीख लोकसभेसाठी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे.
आरजीने इंडिया आघाडीसोबत यावे अशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी वारंवार इच्छा व्यक्त केलीय. मात्र, उमेदवारांची घोषणा केल्याने आघाडीने उशीर केल्याचे परब यांनी म्हटले होते.