
‘उद्योग विस्तारासाठी व्हावेत ‘विलेपार्ले डिरेक्टरी’ सारखे प्रयोग’
छोट्या छोट्या उपनगरातील उद्योगाना स्थानिक ग्राहक मिळवता आला आणि त्याचसोबत त्यांनी आपल्या व्यवसायाची जाहिरात आणि प्रसार उपनगराबाहेरही केला तरच त्यांचा खरा विस्तार झाला असे मानता येईल, आणि यासाठी ‘विलेपार्ले डिरेक्टरी’सारखे प्रयोग निश्चितच झाले पाहिजे. कारण त्यामुळे उपनगरातील उद्योगांना हक्काचे व्यासपीठ मिळेल, असे प्रतिपादन ‘पार्ले भूषण’ पुरस्कार विजेते ज्येष्ठ उद्योजक दीपक घैसास यांनी केले. ‘विलेपार्ले डिरेक्टरी’ २०२४ या विलेपार्लेतील वैशिट्यपूर्ण उद्योग डिरेक्टरीचे साठ्ये महाविद्यालयाच्या सभागृहात प्रकाशन केल्यानंतर ते बोलत होते.
यावेळी ठाणे सहकारी जनता बँकेचे चेअरमन शरद गांगल, ‘आम्ही पार्लेकर’चे संपादक ज्ञानेश चांदेकर, टाऊन पार्लेच्या चंदा मंत्री यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना ज्ञानेश चांदेकर यांनी डिरेक्टरीमागील भूमिका विशद केली. त्यानंतर ॲडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग जाणकार उमेश श्रीखंडे यांनी नेटवर्किंग या विषयावर भूमिका मांडली. तसेच ज्येष्ठ पत्रकार संजीव लाटकर यांनी उत्तम कम्युनिकेशनचे बिझनेस मधील फायदे सांगितले आणि ब्रॅंडिंग एक्सपर्ट रोहित राऊळ यांनी पर्सनल ब्रॅण्डिंग बद्दल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात ‘विलेपार्ले डिरेक्टरी २०२४’ सोबतच डिरेक्टरीच्या डिजीटल ॲपचे देखील अनावरण करण्यात आले. या ॲपचे शरद गांगल यांनी विशेष कौतुक केले. तर चंदा मंत्री यांनी ॲप कसे वापरावे, त्याचे फीचर्स काय आहेत आणि लोकांना याचा कसा फायदा होईल याबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष जाधव यांनी केले.