पदाधिकाऱ्यांकडूनच पाचगणी पालिकेचे कोट्यवधींचे नुकसान
सातारा (महेश पवार) :
पाचगणी नगरपालिकेची मिळकत ऑन व्हिल्ज एम्युजमेंट पार्क तथा कोकणरत्न हॉलिडेज् यांना कवडीमोल दरात भाडे कराराने देवून प्रस्थापित राजकीय पदाधिकाऱ्यांनी पालिकेचे कोट्यवधींचे नुकसान केले आहे. हा नियमबाह्य करार तात्काळ रद्द करावा तसेच मुख्याधिकारी यांच्यासह संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नगरविकास मंत्रालयाकडे आकाश रांजणे यांनी केली आहे.
या संदर्भात सविस्तर माहिती देताना आकाश रांजणे म्हणाले, पाचगणी नगरपालिकेची सर्व्हे नंबर ७ मधील मिळकत शासकीय नियमांचा तसेच नगरपंचायत अधिनियम १९६५ कलम ९२ चा भंग करुन बेकायदेशीर पद्धतीने कोकणरत्न हॉलिडेज् यांना कवडीमोल दराने तीस वर्षाच्या भाडे कराराने दिली आहे.
नियमबाह्य व बेकायदेशीररित्या केलेल्या या करारामुळे नगरपालिकेचे कोट्यवधींचे आर्थिक नुकसान झाले आहे. या नुकसानीस प्रस्थापित राजकीय पदाधिकारी तसेच मुख्याधिकारी जबाबदार आहेत असे सांगून हा करार तात्काळ रद्द करावा तसेच संबंधित सर्वांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नगरविकास मंत्रालयाकडे केली असल्याचे आकाश रांजणे यांनी सांगितले.