गोवा

“मडगाव पॅंडल स्कँडल”ची उच्चस्तरीय चौकशी करा : प्रभव नायक

मडगाव : मडगांवचो आवाज आणि युवा नेते प्रभव नायक यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्र लिहून दिगंबर कामतांकडून  सार्वजनिक बांधकाम खाते त्वरित काढण्याची आणि मडगाव गणेशोत्सव “पॅंडल स्कॅंडल” प्रकरणातील सार्वजनिक निधीच्या गैरवापराबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.


प्रभव नायक यांनी सांगितले की माहिती हक्क कायद्याखाली उघड झालेल्या माहितीनुसार सुमारे ७५ लाख रुपयांच्या “पॅंडल स्कँडल”चा मडगावमध्ये पर्दाफाश झाला आहे. दस्तऐवजांनुसारा, २०२३ ते २०२५ या तीन वर्षांमध्ये मडगावमधील आठ गणेशोत्सव मंडळांच्या नावाने दरवर्षी जी सुमारे २४.९६ लाख रुपयांची मंडप उभारण्याची निवीदा काढून कंत्राट देण्यात आली, त्यातून सरकारी निधीचा थेट गैरवापर झाल्याचे स्पष्ट दिसते.


मंडप उभारणीच्या कामांसाठीचा निधी आमदार स्थानिक क्षेत्र विकास योजनेतून (एमएलए -लॅड) योजनेतून खर्च करण्यात आला असून, त्यामुळे पक्षबदलू मडगावाचे आमदार आणि विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांच्यावर थेट अंगुलीनिर्देश होत आहे. “हे भक्तीच्या नावाखाली आर्थिक गैरव्यवहाराचे स्पष्ट उदाहरण आहे,” असे प्रभव नायक म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक उच्चस्थरीय चौकशी करावी, अशी मागणी प्रभव नायक यांनी पत्रातून केली आहे.


प्रभव नायक यांनी पत्रातून  मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणले की सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे स्वतःच्या निधीतून पॅंडल उभारतात आणि ही मंडळे नोंदणीकृत संस्था किंवा ट्रस्ट असून त्यांच्या खात्यांचे लेखापरीक्षण नियमित केले जाते. “गणेशोत्सव मंडळांच्या माहितीशिवाय किंवा संमतीशिवाय निवीदा कशा काढल्या आणि पैसे कसे मंजूर झाले?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.


प्रभव नायक यांनी मडगावमधील सर्व गणेशोत्सव मंडळांना सत्याच्या बाजूने उभे राहण्याचे आणि कोणत्याही राजकीय दबावाखाली न झुकण्याचे आवाहन केले आहे. “भक्तीच्या नावाखाली भ्रष्टाचार झाकला जाऊ नये,” असे प्रभव नायक यांनी स्पष्ट केले.


मडगांवचो आवाजने मुख्यमंत्र्यांकडे दिगंबर कामत यांचे सार्वजनीक बांधकाम खाते त्वरित काढून टाकावे, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश द्यावेत, सर्व निवीदा आणि खर्चाच्या नोंदी सार्वजनिक कराव्यात आणि जबाबदार अधिकारी व कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. “ देव श्रीगणेशाच्या नावावर राजकीय किंवा आर्थिक लाभ घेणे हे गोमंतकीय संस्कृतीचा आणि श्रद्धेचा अपमान आहे. मडगावच्या जनतेला सत्य आणि पारदर्शकता हवी, फसवणूक व लबाडी  नव्हे”, असा टोला प्रभव नायक यांनी हाणला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!