
मडगावच्या समस्यांसाठी विजय सरदेसाई यांच्याकडे ‘मडगांवचो आवाज’चे निवेदन
मडगाव :
‘मडगांवचो आवाज’ आणि युवा नेते प्रभव नायक यांनी गोवा विधानसभेच्या आगामी अधिवेशनात मांडण्यासाठी मडगाव शहरातील तातडीच्या नागरी समस्या व विकासासंबंधी प्रश्नांचा तसेच लक्षवेधी सुचना व शुन्यकाळातील उल्लेखाचा समावेश असलेले व्यापक निवेदन फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांच्याकडे सादर केले आहे. या निवेदनांतून गोव्याच्या व्यावसायिक राजधानीतील कारभार आणि नियोजनावरील लोकांच्या वाढत्या असंतोषाचे प्रतिबिंब दिसून येते.
प्रभव नायक यांनी सादर केलेल्या विधानसभेतील प्रश्नांमध्ये मडगाव मास्टर प्लॅन २०४१ च्या अंमलबजावणीची सद्यस्थिती व दृष्टीकोन, स्मार्ट सिटी कामांची सुरुवात, तसेच मडगाव नगरपालिकेतील बंद असलेली भरती प्रक्रिया व हल्लीच केलेली शुल्कवाढ यांचा समावेश आहे. सार्वजनिक सल्लामसलत न करता घेतलेले निर्णय, पारदर्शकतेचा अभाव आणि आर्थिक तर्कशुद्धतेवर निर्माण झालेली शंका या मुद्द्यांवर गंभीर चिंता प्रभव नायक यांनी व्यक्त केली आली आहे.
मडगावच्या ऐतिहासिक वारशाचे प्रतिक असलेल्या लोहिया मैदानाच्या दुर्लक्षित अवस्थेकडे लक्ष वेधत त्याच्या विकास, संवर्धन व देखभालीबाबत स्पष्टीकरण मागण्याचे मडगावचो आवाजने विजय सरदेसाईंना सांगितले आहे. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे टर्रशियरी दर्जात रूपांतर अद्याप प्रलंबित असल्याने, त्याविषयी देखील स्पष्टता मागण्याची विनंती प्रभव नायक यांनी केली आहे.
याशिवाय, शून्य प्रहरामध्ये “प्रख्यात मडगावकरांचा सन्मान करणारे स्मारक” उभारण्याची मागणी करण्याचे निवेदनात म्हटले आहे. साहित्य, कला-संस्कृती, क्रीडा, सामाजिक सेवा आणि राजकारण यासारख्या क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी हे आवश्यक असल्याचे प्रभव नायक यांनी विजय सरदेसाई यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
लक्षवेधी सुचने अंतर्गत मडगावमधील शहरी ऱ्हास, बेकायदेशीर बांधकामे व व्यवसाय, वाहतूक व्यवस्थेतील अडथळे व ढासळलेली सार्वजनिक पायाभूत सुविधा यावर तातडीचा ‘रेस्क्यू प्लॅन’ देण्याची मागणी करण्याचे मडगावचो आवाजने म्हटले आहे.
सर्व मुद्द्यांवर आमदार विजय सरदेसाई यांच्याशी सविस्तर चर्चा झाली असून त्यांनी या विषयांचे गांभीर्य लक्षात घेऊन ते विधानसभेत मांडण्याची हमी दिल्याचे प्रभव नायक यांनी सांगितले.
“मडगांवचो आवाज” मडगावचा विकास लोककेंद्रित राहील यावर लक्ष ठेवणार असून, मडगाव शहराच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने काम केले पाहिजे,” असे प्रभव नायक यांनी यावेळी स्पष्ट केले.