राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला सुरूवात…
कन्याकुमारी :
काँग्रेसची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) आज कन्याकुमारीतून पुढे निघणार आहे. काँग्रेस खासदारराहुल गांधी (Rahul Gandhi) तिरंगा फडकवून पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही भारत जोडो यात्रा सुरु करण्यात आली आहे. कन्याकुमारी ते काश्मीर असा 3 हजार 570 किलोमीटरचा प्रवास करण्यात येणार आहे. दरम्यान, काल (7 सप्टेंबर) कन्याकुमारीमध्ये मेळाव्यानं या यात्रेला सुरुवात झाली. या भारत जोडो यात्रेचा पाच महिन्यांचा प्रवास असणार आहे. राहुल गांधी हे कॅम्पमध्येच राहणार आहेत.
कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी चालण्याचा निर्णय घेतल्याबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी त्यांचे आभार मानले. दरम्यान, काल तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याकडे तिरंगा सुपूर्द करण्यात आला. स्वातंत्र्यानंतरच्या भारतातील सर्वात मोठ्या राजकीय चळवळीची सुरुवात झाली असल्याचे काँग्रेसने यावेळी म्हटलं आहे.
यावेळी बोलताना छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी भाजप सरकारवर जोरदान निशाणा लगावला. ज्यांनी इंग्रजांचे समर्थन केले तेच आता देशात विष पसरवत असल्याचे बघेल म्हणाले. भारत जोडो पदयात्रा दररोज सकाळी 7 ते रात्री 10:30 या वेळात तसेच त्यानंतर दुपारी 3:30 ते सायंकाळी 6:30 या दोन टप्प्यात दररोज सुमारे 22 ते 25 किलोमीटर अंतर पार करणार आहे. राहुल गांधी आणि त्यांच्यासोबत असलेले सुमारे 300 काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते प्रवास करणार असल्याचे बघेल म्हणाले.
काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’च्या प्रारंभापूर्वी पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवर एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये राहुल गांधींनी स्वत:चे छायाचित्र ट्विट करत म्हटले आहे की, “द्वेष आणि फाळणीच्या राजकारणात मी माझे वडील गमावले. मी माझा प्रिय देशही गमावणार नाही. प्रेमाचा द्वेषावर विजय होईल. आपण सर्व मिळून जिंकू. असे ट्विट त्यांनी केले होते. काल राहुल गांधी यांनी कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रेचा शुभारंभ केला. तामिळनाडूमधील श्रीपेरुंबदूर येथे त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मारकाला भेट दिली. श्रीपेरंबुदुर हे तेच ठिकाण आहे जिथे राजीव गांधी यांची 21 मे 1991 रोजी लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ एलम दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला होता. ज्यात त्यांचा मृत्यू झाला होता.