
गोवा
बाळ्ळी पंचायतीवर भाजपचे वर्चस्व; हर्षद परीट झाले सरपंच
मडगाव: कुंकळ्ळी आणि केपे या दोन्ही मतदारसंघांशी संबंधित असलेल्या पारोडा पंचायतीवर काल भाजपने (BJP) पुन्हा सत्ता काबीज केलेली असतानाच आज बुधवारी बाळ्ळी पंचायतीवरही आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
बुधवारी (०१ ऑक्टोबर) झालेल्या सरपंच निवडीत भाजपचे हर्षद परीट यांनी काँग्रेसचा पाठिंबा असलेल्या महेंद्र वेळीप यांच्यावर ५ विरुद्ध ४ मतांनी विजय मिळवीत या पंचायतीवर भाजपचा झेंडा फडकविला. परीट हे माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांचे समर्थक असून त्यांच्या निवडीबद्दल कवळेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी कुंकळ्ळीचे माजी आमदार क्लाफास डायस, कुंकळ्ळीचे नगरसेवक विदेश देसाई तसेच सुदेश भिसे हे उपस्थित होते.
पारोडा आणि बाळ्ळी या दोन्ही पंचायतींवर भाजपने विजय मिळविल्याने या दोन्ही पंचायती काँग्रेसच्या हातातून निसटल्या असून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांच्यासाठी हा फटका असल्याचे सिद्ध झाले आहे.