राजस्थानमध्ये काँग्रेसचे ८० आमदार देणार राजीनामा?
राजस्थानमध्ये मुख्यमंत्री बदलाचे वारे वाहू लागले आहेत. राजस्थानचे विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरणार आहेत. त्यामुळे ते राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर आज अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी राजस्थान काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. अशोक गेहलोत यांच्यानंतर राजस्थानचा मुख्यमंत्री म्हणून सचिन पायलट यांच्या नावाची चर्चा आहे. यामुळे अशोक गेहलोत समर्थक आमदार नाराज झाले आहेत.
मुख्यमंत्री गेहलोत यांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीला काँग्रेस अध्यक्षांनी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे आणि अजय माकन यांना निरीक्षक आणि प्रभारी म्हणून पाठवलं आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह दोन्ही निरीक्षक हॉटेलमधून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रवाना झाले आहेत. विधीमंडळ पक्षाची बैठक काही वेळात सुरू होऊ शकते. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासह २५ आमदारही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी उपस्थित आहेत.
इंडियन एक्स्प्रेसला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेहलोत गटाचे सर्व आमदार विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी यांच्या घरी जाऊ शकतात. गेहलोत समर्थक आमदार सामूहिक राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे. सुमारे ८० आमदारांनी त्यांचे राजीनामे लिहिले असून ते सर्व सभापतींच्या घरी नेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.