‘म्हादईवर राजकारणविरहीत चर्चा व्हावी’
“राज्याचे 40 आमदार गोव्याच्या हितासाठी लढा देण्यास कटिबध्द आहेत. म्हादई रक्षणाची जबाबदारी सर्वच आमदारांची आहे. विधानसभा अधिवेशनात आमदारांकडून म्हादई विषयावर चर्चा घेण्याची मागणी झाल्यास आपण ती मंजूर करु” असे सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले.
“सरकारने म्हादईसंदर्भात वेळोवेळी आपली भूमिका मांडलेली आहे. अन्य विषयांवरही चर्चा व्हायला हवी, ही चर्चा राजकारणविरहीत व्हायला हवी ही माझी भूमीका आहे. अधिवेशनाचा कालावधी सभापती ठरवत नाहीत. हा कालावधी बिझनेस अॅडव्हायझरी कमिटी ठरवते. त्यामुळे विरोधकांनी बिनबुडाचे आरोप करु नये” असा सल्लाही त्यांनी यावेळी विरोधकांना दिला.
म्हादईचे पाणी वळवण्याच्या मुद्द्यावर एक दिवसीय चर्चा करण्याची मागणी करणारे पत्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष रमेश तवडकर यांना सादर करणार असल्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी स्पष्ट केले आहे. म्हादईच्या प्रश्नावर एकदिवसीय चर्चेची मागणी करणारे पत्र आपण सोमवारी (सभापतींना सादर करणार असल्याचे आलेमाव यांनी पत्रकारांना सांगितले. अधिवेशनापूर्वी सोमवारी सभागृहाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. अधविशेनात विरोधकांच्या 7 लक्षवेधी मागण्यांवर चर्चा व्हावी अशीही मागणी आलेमाव यांनी केली
म्हादई”चे पाणी दिवसेंदिवस तापत आहे. कर्नाटक सरकारच्या नियोजित ”कळसा-भांडुरा” प्रकल्पाच्या सुधारीत अहवालास (डीपीआर) केंद्र सरकारने मान्यता दिल्यानंतर राज्यात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, 16 ते19 जानेवारी या ४ दिवसांच्या कालावधीत गोव्याच्या विधानसभेचे हिवाळी अधिवेशना होणार आहे. या अधिवेशनात म्हादई प्रश्नावरुन विरोधक सरकारला धारेवर धरणार आहेत. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरवात होणार आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात कोणते मुद्दे गाजणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच अधिवेशनात पुन्हा सत्ताधारीच विरोधकांवर वरचढ होण्याची शक्यता आहे.