
क्रिकेट विश्वाला धक्का देणारी बातमी झिम्बब्वे क्रिकेटने रविवारी दिली आहे. झिम्बाब्वे महिला राष्ट्रीय संघाची सहाय्यक प्रशिक्षक शिनिकिवे एमपोफूचे निधन झाले आहे. तिचा पती शेफर्ड माकुनुरा याचे महिन्याभरापूर्वीच निधन झाले होते. त्यानंतर लगेचच शिनिकिवेनेही अखेरचा श्वास घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
शिनिकिवे 37 वर्षांची होती, तसेच झिम्बाब्वेची माजी महिला क्रिकेटपटू होती. ती शनिवारी सकाळी मासविंगो येथील तिच्या राहत्या घरी अचानक कोसळली. त्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिच्या मृत्यूमागील कारण शोधण्यासाठी पोस्ट-मार्टम करण्यात येणार आहे.
ज्यावेळी शिनिकिवेचे निधन झाले, त्यावेळेपर्यंत ती तिच्या पतीच्या निधनाच्या दु:खातून सावरली नव्हती. तिचे पती माकुनुरा हे झिम्बाब्वे वरिष्ठ पुरुष संघाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक होते. त्यांनी प्रशिक्षण क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी क्रिकेट खेळले होते. त्यांचे 15 डिसेंबर 2022 रोजी निधन झाले होते. या दाम्पत्याच्या मागे दोन मुले आहेत.
शिनिकिवे झिम्बाब्वेची प्रतिभाशाली अष्टपैलू क्रिकेटपटू होती. तिने डिसेंबर 2006 मध्ये झिम्बाब्वे महिला संघाने खेळलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्याचाही ती भाग होती. तिने शाळेल असतानात क्रिकेट खेळणे सुरू केले होते. तिने 2007 मध्ये ताकशिंगा क्रिकेट क्लबमध्ये सामील झाली होती.
तिने तिचे क्रिकेटपटू म्हणून कारकिर्द थांबवल्यानंतर प्रशिक्षण क्षेत्रात पाऊल टाकले. त्यानंतरही तिने झिम्बाब्वे क्रिकेटमधील प्रगतीमध्ये मोलाचे योगदान दिले. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाकडून शिनिकिवे आणि माकुनुरा यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.