ज्या गोमंतकीयांचा जन्म पोर्तुगालमध्ये नोंद आहे, त्यांच्या पासपोर्टचे नूतनीकरण करणे केंद्र सरकारने बंद केले आहे. त्यामुळे त्यांच्या पाल्यांनाही भारतात येणे अशक्य झाले आहे.
त्यांना मूळ भारतीय वंशाचे विदेशी नागरिक (OCI) हे ओळखपत्रही मिळविणे कठीण झाल्याचा विषय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी विदेश व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्याकडे आज उपस्थित केला.
मूळ गोमंतकीय असलेले शेकडोजण विदेशात विशेषतः युरोपात अडकून पडले आहेत. यामुळे याप्रश्नी लक्ष घालावे, अशी मागणी लेखी यांच्याकडे मुख्यमंत्री व पर्यावरणमंत्र्यांनी केली आहे.
गोवा मुक्तीनंतर 1962 मध्ये नागरिकत्व आदेश जारी करून ज्यांनी पोर्तुगीज नागरिकत्व अबाधित ठेवायचे ठरवले असेल, ते वगळता सर्व गोमंतकीय भारतीय नागरिक गणले जातील, असे स्पष्ट केले होते.
अनेकांनी जन्माची नोंद पोर्तुगालमध्ये केली आहे. मात्र, त्यांच्याकडे भारतीय पासपोर्ट आहे. त्याच्या आधारे ते विदेशात व्यवसाय-नोकरीच्या निमित्ताने आहेत. त्यांनी आता पासपोर्टच्या नूतनीकरणासाठी अर्ज केल्यावर केंद्र सरकारने त्यांच्या पासपोर्टचे नूतनीकरण करणे बंद केले आहे.
त्यांच्या पाल्यांनी भारतीय पासपोर्टसाठी विदेशातील भारतीय वकिलातीत अर्ज केल्यावर पासपोर्ट हवा असल्यास सज्ञान होईपर्यंत थांबा असे सांगण्यात येत आहे.
ओसीआय कार्ड घेऊन त्यांना गोव्यात येणेही शक्य होत नाही. कारण त्यांना अशी कार्डे मिळू शकत नाही, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.