वॅग्नर लष्कराच्या बंडानंतर व्लादिमीर पुतिन आक्रमक…
रशियात राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी निर्माण केलेल्या वॅग्नर या खासगी लष्कराने बंडखोरी केली आहे. त्यापार्श्वभूमीवर मॉस्कोच्या क्रेमलिन येथील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तर, वॅग्नर लष्कराचे प्रमुख येवगिनी ग्रिगोझीनने दोन शहरं ताब्यात घेतले असल्याचा दावा केला आहे. अशातच शनिवारी ( २४ जून ) पुतिन यांनी राष्ट्राला संबोधित केलं. “येवगिनी ग्रिगोझीनने पाठित खंजीर खुपसला आहे. वॅग्नर लष्कराला याची किंमत मोजावी लागणार,” असा इशारा पुतिन यांनी दिला आहे.
“रशिया भविष्यासाठी संघर्ष करत आहे. आपल्याला कमकुवत करणाऱ्या गोष्टींना दूर केलं पाहिजे. तसेच, आपल्यातील मतभेद दूर करण्याचीही आवश्यकता आहे. रशियन सैन्यात एकता हवी आहे. जो कोणी बंडाच्या बाजूने उभा राहिलं, त्याला कठोर शिक्षा ठोठावली जाईल,” असं पुतिन यांनी सांगितलं.
“आपल्या पाठित खंजीर खुपसला आहे. याची किंमत त्यांना मोजावी लागणार आहे. देशाबरोबर विश्वासघात झाला असून, या बंडाला चोख प्रत्युत्तर देण्यात येईल. आम्ही देशाचे आणि नागरिकांचे रक्षण करू,” असं पुतिन यांनी म्हटलं.
“रशियन नागरिक, सशस्त्र दल, कायदा अंमलबजावणी संस्था आणि लष्कराला एकत्र येण्याचं आवाहन करतो. पश्चिमेकडील संपूर्ण सैन्य आपल्याविरुद्ध काम करत आहेत. पण, आपण आपल्या नागरिकांची सुरक्षा, स्वातंत्र्यता आणि रशियाचे अधिकार वाचवण्यासाठी लढत आहोत,” असं पुतिन म्हणाले.
“१९१७ साली सुद्धा देश पहिल्या विश्वयुद्धाला सामोरे गेला होता. तशाच प्रकारला हा हल्ला आहे. तेव्हा रशियातील नागरिकांनी आपल्याच लोकांची हत्या केली. याचा लाभ राजकीय आणि विदेशी ताकदींनी घेतला. त्यांनी देशाचे विभाजन करत तुकडे केले. याची पुनरावृत्ती आम्हाला नको आहे,” असं पुतिन यांनी सांगितलं.