माया खरंगटे यांना ‘साहित्य अकादमी’
पणजी (विशेष प्रतिनिधी) :
केंद्रीय साहित्य अकादमीच्या मुख्य पुरस्कारांची आज घोषणा झाली. यामध्ये ज्येष्ठ कोंकणी लेखिका माया खरंगटे यांना त्यांच्या अमृतवेल (२०१६) या कादंबरीसाठी २०२२ चा मुख्य साहित्य अकादमी पुरस्कार घोषित झाला आहे. एक लाख रुपये, साहित्य अकादमीचे मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
साहित्य अकादमीच्या वतीने दरवर्षी २२ भारतीय भाषांतील सर्वोत्तम साहित्याला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. डिसेंबर महिन्यामध्ये या 22 भाषांतील पुरस्कारांची घोषणा होते. कोकणी साहित्यासाठी यावर्षी ज्येष्ठ कोकणी साहित्यिका आणि कोकणी भाषेच्या कार्यकर्त्या माया खरंगटे यांना जाहीर झाला आहे. तर मराठी भाषेसाठीचा पुरस्कार प्रवीण बांदेकर यांना ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या कादंबरी साठी जाहीर झाला आहे.
कोंकणी पुरस्कारासाठी देविदास कदम, एन शिवदास, परेश कामत हे साहित्यिक परीक्षक होते. तर मराठीसाठी भालचंद्र नेमाडे, कुमार केतकर, नितीन रिंढे यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.
आजवर कोंकणी साहित्याची केलेल्या सेवेचे हे फळ आहे, असे मानत या पुरस्काराचा मी विनम्रपणे स्वीकार करत आहे. पुरस्कारासाठी कोणताही साहित्य लिहित नसतो, पण पुरस्कारामुळे त्याला नक्कीच बळ, उत्साह आणि उमेद मिळते. माझीदेखील भावना यापेक्षा फार वेगळी नाही. कथा कथा कादंबरी अशा वेगवेगळ्या प्रकारचे लेखन मी सातत्याने करत आहे. पण साहित्य अकादमीचा पुरस्कार मला कादंबरीसाठी मिळाला हे माझ्यासाठी फार विशेष आहे.
– माया खरंगटे,
साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिका.