जिल्हा बँक अधिकारी ‘का’ करताहेत बोगस कर्ज प्रकरणातील पुरावे नष्ट ?
सातारा (महेश पवार) :
सोनगाव विकास सेवा सोसायटीतील अपहार उघड झाल्यानंतर संबंधिताचे धाबे दणाणले आहेत. प्रकरण अंगलट येणार म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रतापगड कारखाना शाखेतील संबंधित अधिकाऱ्याने पुरावे नष्ट केले असल्याचे समोर आले आहे.
सोनगाव येथील तक्रारदार नारायण शिंदे यांच्या नावे बोगस कर्ज केले असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर तक्रारदाराने बँकेकडे जावून कागदपत्रे पाहिली असता स्लीपवर सह्या नसल्याचे निर्देशनास आले. याबाबत तक्रार केली. त्यानंतर जिल्हा बँकेच्या अधिकार्यांकडून स्लीपवर आता बोगस सह्या केल्याचे समोर आले. परिणामी, जिल्हा बँकेच्या कारभाराविषयी शंका उपस्थित करून संतप्त शेतकऱ्यांनी कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, तक्रार मागे घेण्यासाठी दमदाटी करून दबाव टाकला जात असल्याचे तक्रारदाराने राष्ट्रमत च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.दरम्यान झालेल्या प्रकाराबद्दल जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता अधिकाऱ्यांकडून यासंबंधी बोलण्यास नकार दिला .