म्हावशीत पाणी पुरवठा योजनेत ठेकेदारांची मनमानी; शेतकऱ्यांचे नुकसान…
सातारा (महेश पवार) :
बामणोली नजिकच्या म्हावशी (ता. जावली) येथे सुरु असलेल्या जल जीवन पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा संबंधित अधिकारी व ठेकेदारासह गावातील काही लोकांकडून मनमानी पद्धतीने काम सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थ प्रदिप भोसले यांनी केला आहे. गट क्रमांक ४१ मध्ये ठेकेदाराने परवानगी न घेताच पाईप टाकण्याची मनमानी केली आहे. त्याला हरकत घेवून प्रदिप भोसले यांनी प्रशासनाकडे तक्रार केल्याने ठेकेदारासह संबंधित अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे.
म्हावशी गावात जल जीवन योजना अंतर्गत पाणी योजनेचे काम सुरु करण्यात आले आहे. परवानगी न घेताच मोहिते नावाच्या ठेकेदाराने जेसीबीच्या साह्याने आमच्या जमिनीत मनमानी पद्धतीने खोदकाम करून पाईप टाकण्याचे काम केले आहे. गट क्रमांक ४१ मधील रस्ता प्रकरणी न्यायालयात खटला सुरु आहे. न्यायालयाची परवानगी घेतल्याशिवाय गट क्रमांक ४१ मधील शेत जमिनीत खोदकाम करू नका असे ठेकेदाराला सांगितले होते.
मात्र ठेकेदाराने मनमानी पद्धतीने गट क्रमांक ४१ मधील शेत जमिनीत खोदकाम करून पाईप टाकली असल्याचा आरोप प्रदीप भोसले यांनी केला आहे. सुरू असलेल्या कामाला हरकत घेऊन भोसले कुटुंबियांनी तहसीलदार यांच्याकडे रितसर तक्रार केली आहे. दरम्यान, प्रशासनाकडून संबंधित सर्वांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानुसार बुधवारी दि. ३१ मे रोजी मंडलाधिकारी यांनी तलाठी, सरपंच, तक्रारदार आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत स्थळ पाहणी करून पंचनामा केला. दरम्यान, स्थळ पंचनामा करतेवेळी कागदपत्रासह उपस्थित राहण्याच्या सुचना प्रशासनाने दिल्या असताना ठेकेदार, ग्रामपंचायत प्रशासन यापैकी कुणीही आवश्यक कागदपत्रे सादर केली नसल्याने प्रदीप भोसले यांनी मंडलाधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात आक्षेप नोंदवला.
जल योजनेचे काम अत्यंत चुकीच्या पद्धतीने सुरू असून त्यात काहीतरी काळेबेरे असल्याचा आरोपही याप्रसंगी त्यांनी केला. तक्रार केल्यानंतर न्यायालयात जाण्यास सांगण्याचा उद्दामपणा प्रशासनातील काही अधिकारी करीत असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत जल जीवन पाणी पुरवठा योजनेची कामे अनेक गावांमध्ये सुरु असली तरी बहुतांश ठिकाणच्या कामांमध्ये सावळागोंधळ सुरु असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
म्हावशी येथील या जल जीवन योजनेच्या कामासंदर्भात ग्रामपंचायतीच्या सरपंचांना विचारलं असता या विषयावर बोलणं टाळलं, यामुळे याठिकाणी सुरू असलेल्या मनमानी कारभारात सरपंचाची साथ असल्याने व ठेकेदाराला अभय दिल्याने स्थानिकांवर अन्याय होत असल्याचीही परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे . महत्वाचे म्हणजे ग्रामपंचायत आणि ठेकेदार यांच्याकडे मंजूर आराखडाच नसून म्हावशी येथे सुरू असलेलं काम अंदाज पंचे आणि मनमानी पद्धतीने सुरू असल्याचं चित्र समोर आले, असे प्रदीप भोसले यांनी सांगितले.
यामुळे ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या मनमानीला जिल्हा परिषदेचे सीईओ कधी आणि केव्हा चाप लावणार हाच खरा प्रश्न आहे. आंधळं दळतयं अन् कुत्रं पीठ खातयं अशी स्थिती जल जीवन योजनेच्या कामांची झाली असून त्यात सुधारणा व्हावी अशी जनतेची अपेक्षा आहे.