चोरीचे २१ गुन्हे उघड, ३६ लाख ७४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
सातारा (महेश पवार) :
पोलीस अभिलेखा वरील आरोपीकडून एक दरोडा, एक जबरी चोरी व १९ घरफोड्या असे एकूण २१ गुन्हे उघड करून चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी चालू बाजार भाव प्रमाणे 35 लाख 84 हजार रुपये किमतीचे 64 तोळे सोन्याचे दागिने व चाळीस हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने तसेच पन्नास हजार रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण 36 लाख 74 हजार रुपये किमतींचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी, दिनांक 13 एप्रिल रोजी पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारांमार्फत माहिती प्राप्त झाली की, पोलीस अभिलेखा वरील आरोपी चाँद उर्फ सुरज जालिंदर पवार याचा लोणंद पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 81/ 2023 भारतीय दंड विधान कलम 394, 457, 34 या गुन्ह्यांमध्ये सहभाग असून तो काळज गावचे हद्दीतील बडेखान या ठिकाणी आहे. तसेच नमूद आरोपी हा अत्यंत हुशार असून तो गुन्ह्याचे तपास कामी मिळून येत नव्हता. त्याच्या गुन्हे पद्धतीचा अभ्यास करून पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, पोलीस अंमलदार तानाजी माने, अमोल माने, अर्जुन शिरतोडे, अजित कर्णे, स्वप्निल माने, शिवाजी भिसे, स्वप्निल दौंड यांच्या तपास पथकाने बडेखान परिसरामध्ये सतत तीन दिवस अहोरात्र सापळा लावून रानावनात काटेरी झाडाझुडपात त्याचा पाठलाग करून आरोपी चाँद उर्फ सुरज जालिंदर पवार वय 22 राहणार काळज तालुका फलटण याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे विचारपूस केली असता सदरचा गुन्हा त्याने त्याचे साथीदार पृथ्वीराज युरोपियन शिंदे वय 25 वर्ष राहणार ठाकुरकी फलटण, चिलम्या उर्फ संदीप महावीर उर्फ माळव्या शिंदे वय 22 वर्ष राहणार सुरवाडी तालुका फलटण व इतर तीन साथीदारांच्या सह केला असल्याचे त्यांनी सांगितले. या तीन आरोपींना नमूद गुन्ह्यात अटक करून त्यांची पाच दिवस पोलीस कोठडी घेतली. तसेच नमूद गुन्हा सहा आरोपींनी केला असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले.