राजकीय वरदहस्त असलेल्या मद्यधुंद वाहनचालकाच्या मस्तीत गेला मुक्या प्राण्याचा जीव…
सातारा (महेश पवार) :
शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण एकाही निरापराध व्यक्तीला शिक्षा होता कामा नये, हे माणसांच्या बाबतीतील न्याय व्यवस्थेचं ब्रीद येथील प्रशासकीय व राजकीय कारभाऱ्यांनी भलतचं मनावर घेतलेलं दिसतयं पण ते उलट्या अर्थाने घेतलंय एव्हढचं! असं म्हणण्याचं कारण म्हणजे शंभर वन्य प्राणी मेले तरी अन् निसर्ग संपदा संपली तरी हरकत नाही पण गल्लाभरु व्यावसायिकांची चांदी मात्र झालीच पाहिजे असे विपरित धोरण कारभाऱ्यांकडून कास परिसरात राबविलं जात असून हा प्रकार संतापजनक आहे.
पर्यटन वाढून स्थानिकांना रोजगार मिळेल अशा प्रकारचं गाजर दाखवत इको सेन्सिटिव्ह झोन असलेल्या कास परिसरात अनाधिकृत बांधकामांना एकप्रकारे संरक्षण देण्याची चुकीची कर्तबगारी कारभारी करीत असून त्याचे गंभीर परिणाम आता समोर येताना दिसत आहेत. कास मार्गावर यवतेश्वरपासून कास तलावापर्यंतच्या परिसरात हॉटेल, ढाबे, लॉज, रिसॉर्ट तसेच खासगी मालकीच्या बंगल्यांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. चंगळवादाला वाव देणारी ही साधने बेसुमार झाल्याने येथे वाहनांसह माणसांची वर्दळ सुद्धा वाढली आहे. पशू पक्षी व जंगली प्राण्यांच्या आदिवासात माणसांची गर्दी झाल्यानंतर निसर्ग सुरक्षित राहील असं म्हणणं मुर्खपणा ठरेल.
कास मार्गावर टायगर क्रॉसिंगचा फलक लावलेल्या परिसरात अतिक्रमणांची दाटी दिसतेय. येथे अद्याप अनाधिकृतपणे बांधकामे सुरू आहेत. नेमकी अशीच स्थिती पठारापर्यंतच्या मार्गावर दिसतेय. जिल्हा प्रशासन कारवाई करण्याचं धाडस दाखवतं नाही. राजकीय सोईसाठी नेते अवैध बांधकामांना संरक्षण देण्याचा आटापिटा करताहेत. अशा स्थितीत चांगलं काय घडणार? भरधाव वाहनांच्या धडकेत मुके प्राणी चिरडले जात आहेत.
नुकतेच हेरिटेज् वाडी परिसरात रस्त्यावर भरदिवसा एक एका राजकीय वरदहस्त असणारा धनाढ्य व मद्यधुंद वाहनचालक भेकराला चिरडून निघून गेला. या आधीही अशा प्रकारच्या घटना घडल्यात. यात जंगली प्राण्यांचा दोष तो काय? भेकर जीवानिशी गेलं. कास परिसर आपला राहिला नाही तो आता धनदांडग्या व्यावसायिकांचा झालायं हेच ते बिच्चारं भेकर विसरलं, रस्त्यावर आलं अन् कायमचं गेलं. उपहासाने म्हणावं वाटतं, ना सत्ताधारी ना अधिकारी चुकला, चूक त्याचीच….
धनदांडग्यांच्या रस्त्यावर आलं अन् हकनाक गेलं.