‘धार्मिक कार्यक्रमात राजकारण आणू नका’
सातारा (महेश पवार) :
सुतारवाडी-गोगवे येथील विश्वकर्मा जयंती उत्सव कार्यक्रमात खो घालण्याचं घाणेरडं राजकारण विरोधकांनी केलं. ते आम्ही हाणून पाडलं. हा उत्सव दरवर्षी होणारचं. राज्यात सत्ता बदलली आहे. महाआघाडीचं सरकार राहिलेलं नाही, हे काँग्रेस – राष्ट्रवादीच्या मंडळीनी विसरु नये. धार्मिक कार्यक्रमात त्यांनी राजकारण करु नये, ते खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी दिला.
महाबळेश्वर तालुक्यातील सुतारवाडी-गोगवे येथे विश्वकर्मा जयंती उत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. विरोधकांचा जोरदार समाचार घेताना पुरुषोत्तम जाधव म्हणाले, राज्यात चुकीच्या पध्दतीने सत्तेवर आलेलं सरकार दरे गावचे सुपुत्र एकनाथराव शिंदे यांनी उलथून लावलं. सत्ता बदलली अन् बाळासाहेबांची शिवसेना व भाजप युतीचं सरकार सत्तेवर आलं. कट्टर शिवसैनिक असलेल्या महाबळेश्वर तालुक्यात बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेची सत्ता आली आहे. येणाऱ्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य सुद्धा आपलाच असेल. आगामी काळात तालुक्याच्या राजकारणातून विरोधक हद्दपार होतील. विकासकामांचे प्रस्ताव द्या, तुमची सर्व कामे केली जातील. तुमच्या भागात सोळशी धरण होणार आहे. त्याचं पाणी याच भागाला प्राधान्याने दिलं जाईल, असे श्री जाधव यांनी सांगितले. कार्यक्रमातील उत्कृष्ट नियोजनासाठी त्यांनी संबंधित सर्वांचे कौतुक केले.
यावेळी महाबळेश्वर तालुकाप्रमुख संजय शेलार, ज्येष्ठ नेते चंद्रकांत गुरुजी, तालुकाप्रमुख बबन सपकाळ, महाबळेश्वर शहप्रमुख विजय नायडू, पत्रकार गणेश उत्तेकर, ज्येष्ठ शिवसैनिक विठ्ठल शिंदे, सरपंच सौ. विद्या कदम, विभागप्रमुख बाळू माने, बबन उत्तेकर, ज्येष्ठ शिवसैनिक हरिभाऊ सपकाळ यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.