
सातारा
‘…अन्यथा शंभूराजेंच्या घरासमोर करणार आत्मदहन’
शंभूराजे देसाई यांनी ओबीसी महिला सरपंचाला टाकलं वाळीत ?
सातारा (महेश पवार) :
ग्रामपंचायत गमेवाडी येथील ओबीसी आरक्षणातून सरपंच झालेल्या सविता ढवळे यांना गावचे उपसरपंच ग्रामपंचायत बॉडी सरपंच म्हणून गावाचा कारभार करु देत नाहीत. तसेच कामात अडथळे आणतात. सरपंच झाल्यापासून झेंडावंदन करु देत नाहीत. मी त्यांना चुकीच्या कामांना सहकार्य करत नाही म्हणून राजकीय दबाव टाकून उलट माझ्यावर अन्याय केला जात आहे. आणि आमचे नेते पालकमंत्री शंभूराज देसाई यांना यात लक्ष घालण्याची विनंती केल्यानंतरही ते लक्ष देईनात. त्यांनी तर मला वाळीत टाकलंय. ते पालकमंत्री आहेत की मारकमंत्री? असा सवाल सविता ढवळे सरपंच गमेवाडी यांनी केला , मला न्याय न दिल्यास त्यांच्या घरासमोर आई- वडिलांसह आत्मदहन करेन, असा निर्वाणीचा इशारा गमेवाडीच्या सरपंच सविता ढवळे यांनी दिला आहे.
कराड तालुक्यातील गमेवाडीच्या सरपंच सविता ढवळे गेल्या काही दिवसांपासून आपल्या वृध्द आई वडिलांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनासाठी बसल्या आहेत.
मी सरपंचपदाचा राजीनामा द्यावा यासाठीच माझ्यावर उपसरपंच व सदस्यांकडून अप्रत्यक्षपणे दबाब आणला जात आहे. त्यांच्या मनाप्रमाणे मी कामकाज करावं यासाठी हे दबाबतंत्र असून हा माझ्यावर अन्याय आहे. मला घरकूल मंजूर असतानाही आजपर्यंत यांनी घर मिळू दिलं नाही. प्रशासनातील वरिष्ठ सुद्धा संगनमताने असहकाराच्या भुमिकेत आहेत. न्याय न मिळाल्यास पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घरासमोर आत्मदहन करेन, असा संतप्त इशारा सविता ढवळे यांनी दिला आहे.